भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने गुरुवारी अंतराळ मोहीमेत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अत्याधुनिक संचार उपग्रह जीसॅट १७ चे गुरुवारी फ्रेंच गयानामधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ‘एरियन- ५’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून जीसॅट १७ हे अंतराळात झेपावले.

जीसॅट १७ या उपग्रहाचे बुधवारी दुपारी प्रक्षेपण होणार होते. मात्र खराब हवामानामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले. शेवटी गुरुवारी हवामान प्रक्षेपणासाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट झाल्यावर जीसॅट-१७ उपग्रह अंतराळात झेपावले. जीसॅट १७ हा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह आहे. या उपग्रहाचे वजन ३,४७७ किलो असून या उपग्रहामध्ये दूरसंचार सेवेसाठी नॉर्मल सी बँड, एक्स्टेंडेड सी बँड आणि सी बँड आहे. याशिवाय हवामानाविषयीची माहिती आणि शोधमोहीम आणि मदतकार्य करण्यासाठी या उपग्रहाचा वापर करता येणार आहे. यासाठी उपग्रहामध्ये उपकरणेही लावण्यात आली आहे. गुरुवारी फ्रेंच प्रक्षेपक एरियन-५ वीए २३८ च्या माध्यमातून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच इस्रोने जीएसएलव्ही-मार्क ३ च्या साह्याने जीसॅट-१९ हे उपग्रह अंतराळात पाठवले होते. या यशस्वी प्रक्षेपणानंतर गेल्या आठवड्यात इस्रोने ३१ नॅनो उपग्रह अंतराळात पाठवले होते. यातील २९ उपग्रह हे १४ देशांचे होते यापाठोपाठ जीसॅट १७चेही यशस्वी प्रक्षेपण झाले आहे.