ISSF विश्नचषकात राही सरनोबतने नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. राहीने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे. सुवर्ण पदकासोबतच राहीने 2020 मध्ये टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेचेही तिकिट पक्के केले आहे. यापूर्वी 2013 साली झालेल्या चांगवन विश्वचषक स्पर्धेतही राहीने सुवर्ण पदक पटकावले होते.

ISSF विश्वचषक स्पर्धेत भारताला मिळालेले हे तिसरे सुवर्ण पदक आहे. यापूर्वी नेमबाज सौरभ चौधरी याने पुरूषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक पदक पटकावले होते. तसेच त्याने नवा जागतिक विक्रमही केला होता. मेरठच्या 17 वर्षीय सौरभ चौधरी याने अंतिम सामन्यात 246.3 गुणांची कमाई केली होती. यापूर्वी नवी दिल्लीत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने 245 गुणांची कमाई केली होती. त्याने यावेळी आपलाच जुना विक्रम मोडला. सौरभ चौधरी याने यापूर्वीच टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे.

रविवारी अपूर्वी चंदेलाने महिलांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. तर दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत रशियाच्या आर्तम चेरसुनोव्हलाने रौप्य आणि चीनच्या वेई पेंगने कांस्य पदक पटकावले होते.