उत्तर प्रदेशात आयकर विभागाने वर्षातील सर्वात मोठी कारवाई केली असून १०० किलो सोनं आणि १० कोटी रोख रक्कम जप्त केली आहे. लखनऊमधील एका कंपनीवर छापेमारी करताना आयकर विभागाच्या हाती हे घबाड लागलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकारी दोन दिवस कारवाई करत होते. यावेळी त्यांच्या हाती ३२ कोटी रुपये किमतीचं १०० किलो सोनं लागलं. आयकर विभागाला जमीन व्यवहारासंबंधी काही कागदपत्रं आणि परदेशात गुंतवणूक केल्याचेही पुरावे मिळाले आहेत.

आयकर विभागाने मुंबई आणि लखनऊत सहा ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली आहे. ही छापेमारी व्यवसायिक कन्हैयालाल रस्तोगी आणि संजय रस्तोगी यांच्यावर करण्यात आली आहे. दोघेही भाऊ आहेत. आरोपानुसार, कंपनीने मोठ्या प्रमाणात करचोरी करत साम्राज्य उभं केलं आहे. आयकर विभागाने कंपनीच्या लखनऊमधील राजा बाजार येथील कार्यालयावर पहिला छापा टाकला. छापेमारीत आयकर विभागाचे १०० पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते.

जप्त करण्यात आलेल्या सोन्यातील ८७ किलो सोन्याचे बिस्किट आहेत. सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. दागिन्यांची बिलं नसल्याने ती जप्त करण्यात आली आहेत. रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांना छापेमारीत चलनातून बाद झालेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्याही नोटाही सापडल्या आहेत.