प्राप्तिकर विभागाने करचुकवेगिरीच्या एकूण १०० प्रकरणांत संबंधित व्यक्ती व आस्थापनांवर खटले भरण्याचे ठरवले आहे, एचएसबीसी या बँकेत खाते असलेल्या काळ्या पैसेवाल्यांच्या यादीतील ही शंभर प्रकरणे आहेत.
प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, आम्हाला या प्रकरणांमधून जी वसुली केली जाईल त्यात ३२०० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर अधिकारी आता करचुकवेगिरीच्या आरोपाखील कलम २७६ सी (१) (मुद्दामून कर चुकवणे व दंड चुकवणे), कलम २७६ डी ( खाते व त्यासंबंधीची कागदपत्रे दाखवण्यात असमर्थता) या मुद्दय़ांवर खटले भरणार आहे. असे एकूण १०० खटले ३१ मार्च अखेर एचएसबीसीच्या जिनिव्हा बँकेत काळे पैसे असलेल्यांवर दाखल होणार आहेत. आतापर्यंत साठ खटले दाखल करण्यात आले आहेत. एकूण ३२०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूलही यावेळी गोळा केला जाणार आहे. एकूण वसुली ७ हजार कोटींची अपेक्षित आहे. कर व महसूल या प्रती आतापर्यंत ३१५० कोटी रुपये वसूल झाले आहेत. एचएसबीसी बँकेतील २४० प्रकरणांवर प्राप्तिकर खाते लक्ष ठेवून आहे कारण ती खाती संशयित आहेत. काही भारतीयांचे तेथे काळे पैसे आहेत. ३१ डिसेंबर अखेर १२८ प्रकरणांत कारवाई करण्यात आली असून एकूण ६२८ जणांची नावे एचएसबीसीच्या चोरलेल्या यादीत सापडली आहेत. ही यादी फ्रान्सने भारताला काही वर्षांंपूर्वी दिली होती. जिनिव्हा बँकेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच ही नावे फोडली होती. ६२८ जणांपैकी २०० अनिवासी भारतीय किंवा सापडत नसलेल्या व्यक्ती आहेत. एकूण ४२८ प्रकरणांत कारवाई करणे शक्य आहे, त्याच्याशी संबंधित एकू ण रक्कम ही ४५०० कोटी रुपये आहे. ३१ मार्चनंतर या खातेदारांवर कायदेशीर कारवाई करता येणार नाही त्यामुळे खटले दाखल करण्याची लगीनघाई सुरू आहे.