अमक्या नेत्याच्या विधानाला, त्याच्या जाहीर सभेच्या छायाचित्राला फेसबुकवर प्रचंड लाइक्स मिळाले, तमक्या नेत्याच्या भाषणाला यूटय़ूबवर लाखो हिट्स मिळाल्या, ढमक्या नेत्याने विरोधकांवर केलेल्या शेरेबाजी किंवा टीकेवर सकाळपासून अनेक ट्विट्स प्राप्त झाले.. असा काही प्रचार सोशल मीडियावर होत असेल तर तो खराच आहे आणि फलाणा नेता एवढा लोकप्रिय आहे असा निष्कर्ष कोणी काढत असेल तर सावधान.. ही लोकप्रियता आभासी असू शकते. नव्हे ती तशी असतेच असा गौप्यस्फोट कोब्रापोस्ट या संकेतस्थळाने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’वरून स्पष्ट झाले आहे.
पाच राज्यांमध्ये सध्या निवडणुकांचे वारे सुरू आहेत. प्रत्येक पक्ष आपले ढोल वाजवत आहे. सोशल मीडियाही त्याला अपवाद नाही. फेसबुक, ट्विटर, यूटय़ूब यांच्या माध्यमातून एकाच क्लिकवर लाखो मतदारांपर्यंत पोहोचता येत असल्याने सर्वच राजकीय पक्ष बिनबोभाटपणे या मीडियाचा वापर करत आहे. मात्र, यात ग्यानबाची मेख आहे.
कोब्रापोस्टने केलेल्या ‘ऑपरेशन ब्ल्यू व्हायरस’ या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून हे स्पष्ट झाले आहे. देशभरातील दोन डझन आयटी कंपन्या राजकीय नेत्यांकडून रग्गड पैसा मोजून आभासी जगात त्यांची लोकप्रियता अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी खोटय़ा लाइक्स आणि हिट्स पेरत असल्याचे या ‘स्टिंग ऑपरेशन’मधून उघडकीस आले.
केवळ एखाद्या नेत्याची प्रसिद्धी किंवा प्रतिमासंवर्धनाची मोहीम नव्हे तर त्याच्या विरोधकांची प्रतिमाहनन करण्याची पद्धतशीर मोहीमही या कंपन्या चालवत असल्याचे उघड झाले आहे.

सुशीलकुमारांचेही शिक्कामोर्तब
कोब्रापोस्टच्या दाव्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे. गुप्तचर यंत्रणांच्या बैठकीत आपण अलीकडेच हा प्रश्न उपस्थित केला होता आणि आपली भीती खरी ठरली, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. सुरक्षा यंत्रणांकडून या बाबत आणखी माहिती मिळविण्याची आपली इच्छा आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.

गलिच्छ राजकारणाचा भाग – जावडेकर
कोब्रापोस्टने स्टिंग ऑपरेशनद्वारे जी बाब उघडकीस आणली आहे तो काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणाचा प्रकार असून, पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने काँग्रेसकडून असे प्रकार होत असल्याचे भाजपने म्हटले आहे. सोशल मीडियाच्या वापराबद्दल कोब्रापोस्टने केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे भाजपने संपूर्ण खंडन केले आहे.

भाजप आणि मोदी अग्रणी
या सर्व खोटय़ा व आभासी प्रचारात भाजप आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी अग्रेसर असल्याचा दावा कोब्रापोस्टने केला आहे. मोदीच लक्ष्य का असे विचारले असता ज्या आयटी कंपन्यांकडे विचारणा केली त्यांच्याशी झालेल्या संभाषणात पाच ते सहा वेळा मोदींचा उल्लेख झाल्याचे कोब्रापोस्टचे संपादक अनिरुद्ध बहल यांनी स्पष्ट केले. अमेरिका, कोरिया यासारख्या देशांमधूनही नकारात्मक संदेश ऑनलाइन पाठविला जातो. त्यामुळे त्याचा स्रोत शोधणे कठीण होते. नकारात्मक प्रचारासाठी जोडणीकृत संगणकाचा वापर होतो आणि प्रकल्प पूर्ण झाला की तो नष्ट केला जातो. तासागणिक बदलणारे छुपे कोडही वापरण्यात येतात़  त्यामुळे तपास अधिक कठीण होतो, असे बहल म्हणाले.

असे होते स्टिंग ऑपरेशन..
* कोब्रापोस्टचे सहसंपादक सईद हसन यांनी २४ आयटी कंपन्यांना ‘नेताजीं’च्या प्रसिद्धीविषयी विचारणा केली़
* आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नेताजींची प्रसिद्धी आणि विरोधकांची नाचक्की करण्यास संबंधित कंपन्यांना सांगितले.
* सर्वच आयटी कंपन्यांनी तयारी दाखवली, खोटय़ा लाइक्स-हिट्स मिळवून देण्याची हमी दिली़
* या मोहिमेसाठी लाखो रुपये शुल्काची मागणी केली़
* हॅकिंग टाळण्यासाठी परदेशातून संबंधित विरोधकांच्या बदनामीचा मजकूर प्रसिद्ध करण्याची हमीही दिली़
* बदनामीकारक मजकुराचा स्रोत कळू नये यासाठी दर तासाला त्याचे उगमस्थान बदलण्याचीही हमी.