देशामधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून विरोधकांकडून पाठिंबा मिळेल आणि ते भाजपाविरोधी गटाचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व करतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्यात. मात्र खुद्द शरद पवार यांनीच यासंदर्भात बुधवारी रात्री खुलासा करत अद्याप काहीही ठरलेलं नसल्याचं सांगितलं आहे. तसेच मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याचं वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचंही पवार म्हणालेत.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडे बहुमत असल्याचे स्पष्ट संकेत देत पवारांनी आपण उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. “राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मी उमदेवार असेल हे पूर्णपणे खोटं वृत्त आहे. एका पक्षाकडे ३०० हून अधिक खासदार असताना याचा (राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा) निकाल काय असणार आहे मला ठाऊक आहे. मी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार नसेन,” असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकींबद्दलही पवार यांनी खुलासा केलाय. प्रशांत किशोर यांनी दोन वेळा माझी भेट घेतली. मात्र त्यावेळी आम्ही केवळ त्यांच्या कंपनीबद्दल बोललो. २०२४ च्या निवडणुकींमध्ये किंवा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकींमध्ये नेतृत्व कोणाकडे असावं यासंदर्भात आमची चर्चा झाली नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच प्रशांत किशोर यांनी आपण निवडणुकीच्या नियोजनासंदर्भातील क्षेत्र सोडल्याचंही मला सांगितल्याचं पवार म्हणाले.

निवडणुकींसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचंही पवारांनी सांगितलं. २०२४ ची निवडणूक असो किंवा राज्यामधील निवडणूक असून अद्याप कशासंदर्भात काहीही निर्णय झालेला नाही. निवडणूक अजून फार दूर आहे आणि राजकीय परिस्थिती बदलत राहते. २०२४ मध्ये नेतृत्व कोणाकडे असेल यासंदर्भात मी कोणतेही अंदाज बांधणार नाही, असं पवार म्हणाले.

पवारांनी दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे सध्या तरी त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचं चित्र दिसत आहे.