करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि लॉकडाउन यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे झालेल्या या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मजुरांचं होत असलेलं स्थलांतर साहजिक असलं, तरी यामुळे राज्यांसमोरचं मोठं संकट उभं राहु शकतं,” अशी चिंता व्यक्त केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह जवळपास सर्वच राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीला हजर होते. तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवण्यात आल्यानंतर मजुरांच्या स्थलांतरणाचा मुद्दा उग्र झाला. अनेक मजुरांनी पायीच घराचा रस्ता धरला आहे. मजुरांच्या स्थलांतरणावर मोदी यांनी भाष्य केलं. पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी मजुरांची घरी जाण्याची गरज समजू शकतो. लॉकडाउन लागू केल्यानंतर लोकांना जिथे आहेत, तिथेचं थांबावं यावर आपण जोर दिला होता. पण घरी जाणं हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे आपल्याला काही निर्णय बदलावे लागले. आता मजूर गावाकडे जात आहे. आपापल्या घरी पोहोचत आहे. पण, आपल्यासमोर मोठं संकट असणार आहे. करोना गावापर्यंत पोहोचणार हे आपल्यासमोरचं आव्हान आहे,” असं मोदी म्हणाले.

या बैठकीत देशातील लॉकडाउनसंदर्भात चर्चा सुरू असून, त्यावर सर्व राज्यांच्या भूमिका पंतप्रधान मोदी जाणून घेत आहेत. त्याचबरोबर करोनामुळे वेगवेगळ्या राज्यात निर्माण झालेल्या स्थितीचाही पंतप्रधान मोदी यांनी आढावा घेतला. त्यावरून १७ मे नंतर लॉकडाउनसंदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो. तूर्तास महाराष्ट्रातील मुंबई आणि इतर काही शहरातील स्थिती गंभीर आहे. त्यामुळे उर्वरित राज्यातील लॉकडाउन शिथिल करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्याचबरोबर मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर यासह इतर हॉटस्पॉट असलेल्या शहरात प्रसार रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसर्दभात मोदींनी मार्गदर्शन केलं.