लसीकरण मोहिमेतील दिरंगाईचा परिणाम; जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयाची प्रतीक्षा

नवी दिल्ली : करोना लशींच्या तुटवड्यामुळे देशातील लसीकरण मोहिमेला फटका बसला असून अनेक राज्यांमध्ये लसीकरण ठप्प झाले आहे. लसीकरणातील ही दिरंगाई आणि संथगती अशीच राहिली तर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध ३१ मेनंतरही उठण्याची शक्यता दृष्टिक्षेपात नाही. त्याचा परिणाम आर्थिक, व्यापार, उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांवर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लसीकरण झालेल्या प्रवाशांना युरोपीय देशांमध्ये प्रवेश देण्याबाबत युरोपीय महासंघामध्ये सकारात्मक चर्चा केली जात असली तरी, जागतिक आरोग्य संघटनेत मात्र त्यावर सहमती झालेली नाही. त्यामुळे लसीकरणानंतर परदेशात जाण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुसरीकडे ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन लशींच्या यादीत समावेश नसल्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही ही लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना परदेश दौरा करणे तुलनेने अवघड असेल, असेही म्हटले जात आहे.

लसीकरण आणि आंतरराष्ट्रीय प्रवास या मुद्यांसंदर्भात केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण केले. लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय प्रवास करू देण्याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. सध्या आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी दिली जात आहे. करोना संसर्ग नसल्याचा अहवाल असेल तरच आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची मुभा दिली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहमतीनंतर भारतही लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला परवानगी देण्याचा निर्णय घेईल, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले.

‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ लशीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन लशींच्या यादीत समावेश नसल्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही ही लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना परदेश दौरा करणे तुलनेने अवघड असेल, असेही म्हटले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत कोव्हॅक्सिन लस समाविष्ट करण्यासाठी ‘भारत बायोटेक’ने अर्ज केला आहे. भारतात उत्पादन होत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन यादीत आहे. त्याचबरोबर फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, चिनी बनावटीची ‘सिनोफार्म’ या लशींचाही समावेश आरोग्य संघटनेच्या यादीत आहे.

करोनाच्या उद्रेकानंतर जगभरातील देशांनी आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केल्या होत्या. भारतानेही आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ मेपर्यंत स्थगित केली आहे. मात्र, ‘वंदेभारत’अंतर्गत भारतीय नागरिकांना देशात परत आणले जात आहे. जर्मनी, अमेरिका आदी काही देशांशी झालेल्या करारानुसार करोनाबाधित नसलेल्या व्यक्तींना प्रवासाची परवानगी दिली जात होती. मात्र, भारतातील दुसऱ्या लाटेमुळे युरोपातील देश, सिंगापूरसारखे पूर्वेकडील देश तसेच अमेरिकेने विमानसेवा बंद केली आहे.

…तर भारतीयांना फायदा : केंद्र

पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची मुभा देण्याबाबत युरोपीय महासंघ तसेच अमेरिका विचार करत आहे. तसा निर्णय युरोपातील देशांनी घेतल्यास भारतातील प्रवाशांनाही फायदा होऊ  शकेल, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या सहमतीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे केंद्रीय आरोग्य सहसचिव अगरवाल यांनी स्पष्ट केले.

 

काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप

जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत ‘कोव्हॅक्सिन’चा समावेश नसल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतल्यास आंतरराष्ट्रीय विमानप्रवास करण्यावर बंदी येईल असा अपप्रचार आणि दिशाभूल करून काँग्रेस देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी केला.

सर्वांसाठी घाई हीच चूक : सीरम

’पुणे : लशींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे की नाही याकडे न पाहता आणि जागतिक आरोग्य संघटनेचे लसीकरणाचे प्राधान्यक्रम दुर्लक्षित करून सर्वांच्या लसीकरणाची घाई करणे, हीच भारताच्या लसीकरण मोहिमेतील चूक असल्याचे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी स्पष्ट केले.

’डॉ. जाधव यांनी एका संस्थेच्या दूरचित्रसंवादात लसीकरण मोहिमेतील त्रुटींवर बोट ठेवले. सुरुवातीला आघाडीवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी लशींचा पुरेसा साठा होता.

’त्यानंतर लसीकरणात सर्व वयोगटांचा अंतर्भाव करताना उपलब्ध लस साठ्याकडे दुर्लक्ष केले गेले. ५० टक्के  आरोग्य सेवक आणि इतर आघाड्यांवरील कर्मचारी वंचित असताना कितीही मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण के ले तरी त्याचे महत्त्व नाही, अशी टिप्पणीही डॉ. जाधव यांनी केली.

विषाणूच्या भारतीय प्रकाराचे आव्हान : ब्रिटन

भारतात प्रथमच आढळलेल्या ‘बी १.६१७.२’ या करोनाच्या उत्परिवर्तीत विषाणू संसर्गापासून संरक्षणासाठी लशींच्या दोन मात्रा घेणे आवश्यक असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य विभागाने प्राथमिक माहितीच्या आधारे स्पष्ट केले आहे. याबाबतचे वृत्त तेथील ‘फायानान्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केले आहे. ब्रिटनमधील या माहितीने भारताच्या आरोग्य सेवेपुढील आव्हान अधोरेखित केले आहे.

कोव्हिशिल्ड ८० टक्के परिमाणकारक :  भारतात सर्वप्रथम आढळलेल्या करोनाच्या बी १.६१७.२ या प्रकाराचा संसर्ग टाळण्यासाठी ऑक्सफर्ड/ अ‍ॅस्ट्राझेन्का किंवा फायझरच्या लशीच्या दोन मात्रा ८० टक्क््यांहून अधिक परिणामकारक असल्याचे ब्रिटनने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ही लस सीरम इन्स्टिट्यूट ‘कोव्हिशिल्ड’ या नावाने उत्पादित करीत आहे.

दोन मात्रा आवश्यक, पण… भारतात आढळलेल्या ‘बी १.६१७.२’ या विषाणूच्या कथित उत्परिवर्तीत प्रकाराच्या प्रतिबंधासाठी लशीच्या दोन मात्रा घेण्याची गरज ब्रिटनच्या आरोग्य विभागाने ठळक केली असली तरी देशात लशींचा तुटवडा असताना हे साध्य करणे अवघड आहे.

‘कोव्हॅक्सिन’चा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. या लशीचा यादीत समावेश करण्याचा वा न करण्याचा निर्णय जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेला नाही. – प्रकाश जावडेकर, केंद्रीय मंत्री