जर एखाद जोडपं हॉटेलमध्ये राहत असेल तर त्याला त्रास देण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. एखादं अविवाहित जोडपं हॉटेलमध्ये एका खोलीत राहणं हा कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. दरम्यान, कलम 21 नुसार तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एकत्र राहू शकता किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकता, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

एखाद्या अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये राहणं किंवा परस्पर सहमतीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. परंतु यासाठी ते जोडपं 18 वर्षांपेक्षा अधिक असलं पाहिजे अशी अट असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिल विनय कुमार गर्ग यांनी दिली. संविधानातील कलम 21 नुसार दिलेल्या अधिकाराप्रमाणे एखाद्या व्यक्तीला आपल्या मर्जीच्या जोडीदारासोबत राहण्याचा आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. त्यासाठी विवाह करण्याची आवश्यकता नसल्याचेही म्हटले होते.

हॉटेलमध्ये थांबले असता एखाद्या अविवाहित जोडप्याला पोलिसांकडून त्रास दिला गेल्यास अथवा त्यांना अटक केल्यास हे त्याच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल, असे गर्ग यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ते जोडपं पोलिसांच्या कारवाईविरोधात संविधानातील कलमांनुसार थेट सर्वोच्च न्यायालय किंना उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकते. याव्यतिरिक्त संबंधित पोलिसांविरोधात पोलीस अधीक्षक किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे, तसेच मानवाधिकार आयोगातही दाद मागण्याची मुभा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केवळ अविवाहित असल्याचे कारण पुढे करून जर हॉटेलनेही त्यांना थांबण्यास परवानगी दिली नाही, तर हेदेखील मूलभूत अधिकाराचे उल्लंघन मानले जाईल. तसेच हॉटेल्ससाठी असलेल्या संस्थेचाही असा कोणता नियम नसल्याचे गर्ग यांनी स्पष्ट केले.

हॉटेलमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान पोलीस एखाद्या जोडप्याकडे आल्यास घाबरण्याची कोणतीही गरज नाही. संबंधित जोडप्याला आपण परस्पर सहमतीने हॉटेलमध्ये थांबले असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवणे बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.