गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक अजब वक्तव्य केलं आहे. “उद्या देव जरी मुख्यमंत्री झाला, तरी प्रत्येकास सरकारी नोकरी देणं शक्य नाही. १०० टक्के लोकांना सरकारी नोकऱ्या सध्यातरी शक्य नाही.” असं पणजी येथे त्यांनी म्हटलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी आपल्या सरकारच्या महत्वाकांक्षी ‘स्वयंपूर्ण मित्र’ या संकल्पनेवर गावांमधील पंचायत प्रतिनिधींशी वेब संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. ‘स्वयंपूर्ण मित्र’ या संकल्पनेचा उद्देश ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणं आहे.

राज्य सरकारच्या ‘स्वयंपूर्ण मित्र’ या संकल्पनेअंतर्गत राजपत्रित अधिकारी पंचायतींचा दौरा करणार आहेत. हे अधिकारी राज्याच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांना, तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी काम करणार आहेत. याशिवाय गावात उपलब्ध साधनांबाबत माहिती घेऊन, या आधारावर गावातील बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, गावकऱ्यांना आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला दिला जाणार असून यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे.

गोव्यात बेरोजगारीचा प्रश्न समोर आला आहे. या ठिकाणी बेरोजगारीचे प्रमाणा १५.४ टक्के आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, राज्यातील बेरोजगारांना प्रत्येक महिन्यास आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत रोजगार मिळाला पाहिजे. त्यांनी हे देखील सांगितले की, गोव्यात रोजागाराच्या अशा अनेक संधी असतात ज्या परराज्यातील लोकं मिळवतात.