‘नेहमी तुमचाच विजय होईल हे शक्य नाही’ असा संदेश आणि भेटवस्तू म्हणून श्ॉम्पेनची एक बाटली ‘फिनमेक्कानिका’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ओरसी यांनी अमेरिकेच्या ‘सिकोरस्की’ कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पाठविली होती, असे इटलीच्या तपास यंत्रणांनी उघड केले आहे.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरचे भारतीय कंत्राट मिळविण्यासाठी सिकोरस्की आणि फिनमेक्कानिका या दोन कंपन्या स्पर्धेत होत्या.
मात्र हे कंत्राट फिनमेक्कानिकाने पटकावले. सध्या या कंत्राटावरून जोरदार वादंग उठला असून ३६०० कोटी रुपयांची दलाली दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
ओरसी ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होते त्याच पंचतारांकित हॉटलमध्ये अमेरिकेच्या सिकोरस्की कंपनीचे शिष्टमंडळही अपघाताने तेथेच आले. ही संधी साधून ओरसी यांनी श्ॉम्पेनची एक बाटली आणि नेहमी तुमचाच विजय होईल हे शक्य नाही, असा संदेश त्यांनी सिकोरस्की कंपनीच्या शिष्टमंडळाला पाठविला होता, असे या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या इटलीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
इटलीच्या एका नामांकित कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे हे वर्तन पाहून अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे प्रमुख संतप्त झाले आणि ते हॉटेलच्या खोलीतून तडकाफडकी निघून गेले. या वेळी त्या हॉटेलमध्ये हजर असलेल्या एका व्यक्तीने असा प्रसंग घडल्याच्या वृत्तावर शिक्कमोर्तब केले आहे.
दरम्यान, टय़ुनिशियामार्फत भारतात दलालीची रक्कम रवाना झाली, असे उघडकीस आल्याने लाचखोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इटलीच्या दोघा उच्चपदस्थ संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर दोषारोप ठेवण्यात येणार आहेत. ओरसी यांच्यासह हेलिकॉप्टर विभागाचे माजी प्रमुख ब्रुनो स्पॅगनोलिनी हे न्यायालयात हजर राहणार आहेत.
टय़ुनिशियामध्ये नोंदणी करण्यात आलेल्या कंपनीमार्फत दलालीची रक्कम देण्यात आली आणि ती भारत आणि मॉरिशसमध्ये एअरोमॅट्रिक्स कंपनीच्या खात्यात जमा करण्यात आली, असे तपासाच्या अहवालात म्हटले आहे. ओरसी आणि स्पॅगनोलिनी यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत.
फिनमेक्कानिकाच्या अधिकाऱ्याला लाचखोरीप्रकरणी अटक करण्यात आली असली तरी यापुढे या कंपनीचा कारभार योग्य पद्धतीने केला जाईल, अशी हमी इटलीचे पंतप्रधान मारिओ मोण्टी यांनी दिली आहे. फिनमेक्कानिका कंपनीचा कारभार स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील, असे पंतप्रधानांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.