बिहार विधानसभा निवडणूक निकालाचे अंतिम चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्तेच्या दिशेने घोडदौड सुरु आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं सध्या तरी आहेत. मात्र, या निवडणुकीचा प्राथमिक अंदाज हाती आल्यानंतर लगेचच काँग्रेस नेत्यांकडून ईव्हीएम बद्दल विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. इव्हीएमवरून उदित राज यांनी ट्विटवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. तर, आता काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी ईव्हीएमबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. ही इव्हीएमला दोष देणं बंद करण्याची वेळ आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही निवडणुकीचा निकाल कसा जरी लागला, तरी ही इव्हीएमला दोष देणं बंद करण्याची वेळ आहे. माझ्या अनुभवानुसार, इव्हीएम प्रणाली ही मजबूत, अचूक व विसंबण्याजोगी आहे. असं वक्तव्यं काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी केलं आहे.

इव्हीएम प्रणाली ही मजबूत, अचूक व विसंबण्याजोगी आहे, असं माझं कायम मत राहिलं आहे. मी त्या बाजूने उभा ठाकलो आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये इव्हीएमबद्दल शंका असणारे लोकं आहेत. ही लोकं ज्यावेळी त्यांच्याविरोधात निकाल लागतो तेव्हा इव्हीएमला दोष देतात. आजपर्यंत त्यांचा दावा शास्त्रीयदृष्ट्या ते सिद्ध करू शकलेले नाहीत.

बिहार निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आल्यानंतर लगेचच काँग्रेसने ईव्हीएमसंदर्भात शंका उपस्थित करण्यात केली. पक्षाचे नेते उदित राज यांनी ट्विटवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. “चंद्रावर आणि मंगळावर जाणारी यंत्र पृथ्वीवरुन नियंत्रित केली जाऊ शकतात तर इव्हीएम का हॅक होऊ शकत नाहीत?,” असं राज यांनी म्हटलं आहे.

“अमेरिकेमध्ये जर इव्हीएमवर निवडणूक झाली असती तर ट्रम्प यांचा पराभव झाला असता का?”, असं ट्विट राज यांनी केलं आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी चंद्रावर आणि मंगळावर जाणाऱ्या यंत्रांवर पृथ्वीवरुन नियंत्रण ठेवता येतं तर इव्हीएम हॅक का होऊ शकत नाही असा प्रश्न विचारला आहे.