राफेल विमानांच्या खरेदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संशय घेतला जातो आहे, आरोप होत आहेत. मात्र बोफोर्स घोटाळा करणारे हा आरोप करत आहेत हे आश्चर्यच आहे असे म्हणत भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. बोफोर्स घोटाळ्यात काँग्रेसचे हात बरबटले आहेत. आधी राहुल गांधी यांनी त्याचे उत्तर द्यावे मग आम्हाला राफेल कराराबाबत विचारावे असेही त्यांनी म्हटले आहे.

राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार आरोप केले आहेत. राफेल कराराबाबत पंतप्रधानांनी बोलले पाहिजे. त्यांनी या करारातून कोणत्या उद्योजकाचा फायदा करून दिला हे देशाला सांगावे अशी मागणी राहुल गांधी यांनी अनेकदा केली आहे. या आरोपांना भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.

एवढेच नाही तर पी चिदंबरम यांच्यावरही रविशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे. राहुल गांधी आणि पी चिदंबरम यांनी कोणत्या ७ खासगी कंपन्यांना फायदा मिळवून दिला हे देशाला सांगावे. पी चिदंबरम यांना तसे करण्यासाठी थेट सांगण्यात आले होते असा आरोपही प्रसाद यांनी केला. लोकसभा निवडणूक निकालांचा निकाल ज्या दिवशी होता त्याच दिवशी चिदंबरम यांच्या आशीर्वादाने ७ खासगी कंपन्यांना नफा मिळवून दिला गेला असाही आरोप प्रसाद यांनी केला आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा, काश्मीर , झारखंड या ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही जिंकलो. मात्र ईशान्य भारतात काँग्रेसची पकड असेल असे आम्हाला वाटले होते. मात्र नुकत्याच हाती आलेल्या निवडणूक निकालांनंतर काँग्रेस ईशान्येकडील राज्यातही शून्य आहे असे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस पक्षाने कायमच टेक्नॉलॉजी आणण्यास विरोध केला कारण टेक्नॉलॉजीमुळे व्यवहार पारदर्शी होतात तेच काँग्रेसला नकोय अशीही टीका रविशंकर प्रसाद यांनी केली.