अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड मिळण्याची आशा बाळगलेल्यांना त्यासाठी कदाचित १५० वर्षे वाट बघायला लागू शकते असा अहवाल एका संस्थेनं दिला आहे. अमेरिकेमध्ये कायमचं राहायचं असेल व काम करायचं असेल तर त्यासाठी ग्रीन कार्ड मिळावं लागतं. तरच आयुष्यभर अमेरिकेत राहायला मिळण्याची हमी मिळते. वॉशिंग्टनमधल्या कॅटो इन्स्टिट्युटनं ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्यांच्या संख्येवरून काही निष्कर्ष काढले आहेत. २०१७ मध्ये किती ग्रीन कार्ड देण्यात आली यावर हे निष्कर्ष बेतलेले आहेत.

एप्रिल २०१८ पर्यंत अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या व ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्या भारतीयांची संख्या ६,३२,२१९ आहे. यामध्ये मुख्य व्यक्ती, त्याची पत्नी, आई वडील व मुलं आदींचा समावेश आहे. आता कुणाला व कधी ग्रीन कार्ड द्यायचं याबाबत काही निकष आहेत. उदाहरणार्थ जो अत्यंत स्कील्ड आहे, उच्चशिक्षित आहे त्यासाठी वाट बघण्याचा काळ सहा वर्षे आहे. या एक्स्ट्रॉऑर्डिनरी प्रकारात ३४,८२४ जण असून त्यांच्यासह ४८,७५४ जोडीदार व मुलांचा समावेश आहे. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे पदवीधारक, त्यांना ग्रीन कार्ड हवं असेल तर १७ वर्ष वाट बघावी लागेल कारण ते तुलनेने कमी स्कील्ड आहेत. अशा भारतीयांची संख्या 54,892 आहे, त्यांच्यासोबत 60,381 कुटुंबीयही याच प्रकारात आले.

त्या नंतर येतो तो कामगारांचा प्रकार. सध्या ज्या गतीनं व्हिसा दिला जातो त्याचा विचार केला तर ग्रीन कार्ड मिळण्यासाठी या प्रकारातल्या भारतीयांना १५१ वर्षे वाट बघावी लागेल, थोडक्यात म्हणजे त्यांना कधीच ग्रीन कार्ड मिळणार नाही असा निष्कर्ष कॅटो या संस्थेनं अभ्यास करून काढला आहे. आत्तापर्यंत ग्रीन कार्डसाठी अर्ज केलेल्या व वाट बघत असलेल्या 6,32,219 भारतीयांपैकी अवघ्या 22,602 जणांना २०१७ या एका वर्षात ग्रीन कार्ड मिळालं आहे. त्यामध्ये १३,०८२ जण हायली स्कील्ड प्रकारात मोडतात, २,८७९ दुसऱ्या प्रकारात मोडतात तर ६,६४१ जण तिसऱ्या प्राकारात येतात.

प्रत्येक प्रकारात किती जणांना ग्रीन कार्ड द्यायचं याला बंधन आहे, त्यामुळे ही यादी लांब होत राहते नी वेटिंग लिस्टचा कालावधीपण वाढत जातो त्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की लाखो भारतीयांना त्यांच्या हयातीत काही अमेरिकेचं कायमचं नागरिकत्व देणारं ग्रीन कार्ड मिळणं सध्याच्या नियमांनुसार तरी अशक्य आहे.