स्वतःला अयप्पाचे भक्त म्हणवणाऱ्यांनी आम्हाला शिव्या दिल्या, धमक्याही दिल्या ही बाब माझ्यासाठी वेदनादायी आहे असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी म्हटले आहे. टॅक्सी ड्रायव्हर्सनी आम्हाला सेवा देऊ नये म्हणून त्यांना धमकावण्यात आलं. तसेच ज्या हॉटेलचे बुकिंग आम्ही केले होते तिथे तोडफोड करू अशा धमक्या देण्यात आल्या. हे अयप्पाचे भक्त आहेत का? जे भक्त म्हणवत आहेत त्यांनी आम्हाला दर्शनापासून रोखले आणि शिव्या दिल्या असाही आरोप तृप्ती देसाईंनी केला.

शबरीमला मंदिरात दर्शनासाठी जाणारच असा पवित्रा घेतलेल्या तृप्ती देसाई रात्री पुण्यात परतणार आहेत. मात्र पुण्याला परतण्यापूर्वी कोची विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ज्यामध्ये त्यांनी अयप्पा भक्तांवर गंभीर आरोप केले आहेत.

मागच्या आठवड्यात त्यांनी केरळच्या शबरीमला मंदिरात जाऊन दर्शन घेणार अशी घोषणा केली. त्यानंतर आपल्याला केरळ सरकारने सुरक्षा पुरवावी यासाठी पत्रही लिहिले. मात्र केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी या पत्राला काहीही प्रतिसाद दिला नाही. शनिवारी म्हणजेच १७ तारखेला मंदिरात प्रवेश करणार अशी भूमिका घेऊन तृप्ती देसाई आज म्हणजेच १६ तारखेला केरळच्या विमानतळावर दाखल झाल्या. मात्र त्यांना तिथेच रोखण्यात आले.

तृप्ती देसाईंना रोखण्यात आल्यावर त्यांनी कोची विमानतळावरच ठिय्या दिला होता. तसेच काहीही झाले तरीही मंदिरात जाणारच अशी भूमिका घेतली होती. मात्र त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली ज्यानंतर त्यांनी पुण्याला परतण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी त्यांनी शबरीमला येथील अयप्पा भक्तांवर धमक्या आणि शिव्या दिल्याचा आरोप केला आहे. तृप्ती देसाईंनी आल्या पावली परत जावे नाहीतर आमच्या छातीवर पाय देऊन त्यांना मंदिरात जावे लागेल असा इशारा आंदोलकांनी दिला होता.