आयकर विभागाने सोमवारी आम आदमी पक्षाला (आप) ३०.६७ कोटींची नोटीस बजावली. ‘आप’ने १३ कोटींच्या उत्पन्नाचा तपशील सादर केलेला नाही. तसेच ६ कोटी रुपयांची देणगी देणाऱ्या ४६२ जणांची पुरेशी माहिती न ठेवल्याने आयकर विभागाने पार्टीला फटकारले आहे.
आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आप’च्या कर तपशीलाची छाननी केल्यानंतर ही नोटीस पाठवण्यात आली.

या नोटीसमध्ये म्हटल्याप्रमाणे ‘आप’ने आपले १३.१६ कोटींचे उत्त्पन्न लपवून ठेवले. २०१४-१५ या आर्थिक वर्षात आपचे एकूण करपात्र उत्त्पन्न ६८.४४ कोटी इतके होते. मात्र, ‘आप’ने देणग्यांपोटी बँक खात्यात जमा झालेली रक्कम उत्त्पन्नात दाखवली नसल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे. ‘आप’ला एकूण ४२६ देणगीदारांकडून ६.२६ कोटी इतकी रक्कम मिळाली होती. याशिवाय, ‘आप’ने आपल्या संकेतस्थळावर त्यांना मिळालेल्या ३६.९५ कोटी कोटींच्या रकमेची माहिती प्रसिद्ध केली नव्हती. याविषयी वारंवार स्पष्टीकरण मागूनही ‘आप’ने त्याला उत्तर दिले नव्हते. त्यामुळे ‘आप’विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.