आपल्या घरावर आयकर विभाग छापा टाकणार आहे असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. पी चिदंबरम यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. निवडणूक प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी हा छापा टाकला जात असल्याचा आरोप पी चिदंबरम यांनी केला आहे. दरम्यान प्राप्तिकर विभागाने रविवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्ली आणि मध्य प्रदेशातील ५२ ठिकाणांवर छापे घातल्यानंतर निवडणूक आयोगाने सरकारी संस्थांना मतदानपूर्व छाप्यांबाबत निष्पक्ष कारवाईची सूचना केली.

पी चिदंबरम यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, ‘चेन्नई आणि माझ्या शिवगंगा मतदारसंघातील घरावर आयकर विभाग छापा टाकणार असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. आम्ही शोध पथकाचं स्वागत करु. आमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही हे आयकर विभागाला माहिती आहे. त्यांनी आणि इतर तपास यंत्रणांनी याआधीही आमच्या घरांची तपासणी केली असून त्यांचा हाती काही लागलेलं नाही. निवडणूक प्रचारातून लक्ष विचलित करण्यासाठी हा छापा टाकला जात आहे’.

‘जनता सरकारकडून सुरु असलेला अत्याचार पाहत असून आगामी निवडणुकीत त्यांना योग्य तो धडा शिकवतील’, असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

कमलनाथप्रकरणी निवडणूक आयोगाची प्राप्तिकर विभागाला ताकीद
प्राप्तिकर विभागाने रविवारी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निकटवर्तीयांच्या दिल्ली आणि मध्य प्रदेशातील ५२ ठिकाणांवर छापे घातल्यानंतर निवडणूक आयोगाने सरकारी संस्थांना मतदानपूर्व छाप्यांबाबत निष्पक्ष कारवाईची सूचना केली.

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अख्यत्यारितील प्राप्तिकर आणि सक्तवसुली संचालनालयाने अशा प्रकारे छापे घालताना ते राजकीयदृष्टय़ा निष्पक्ष असतील याची दक्षता घ्यावी, अशी ताकीद आयोगाने दिली. मतदानपूर्व छापे घालण्यापूर्वी आपल्या अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले.

प्राप्तिकर विभाग आणि पोलीस यांच्या किमान २०० अधिकाऱ्यांनी पहाटे तीनपासून छापे घालण्यास सुरुवात केली. यात मोठय़ा प्रमाणात रोकड जप्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. निवडणूक काळात हवालामार्गे आणि करचुकवेगिरीतून पैसे उभे करण्यात असल्याच्या संशयातून हे छापे घालण्यात आले. इंदूर, भोपाळ, दिल्ली (ग्रीन पार्क) येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. कमलनाथ यांचे माजी विशेष अधिकारी प्रवीण कक्कड, माजी सल्लागार राजेंद्र मिगलानी आणि त्यांच्या मेहुण्याच्या मोसर बेयर कंपनीशी संबंधित अधिकारी, त्याचबरोबर पुतण्या रतुल पुरी याच्या कंपनीवर छापे टाकण्यात आले.

कक्कर आणि मिगलानी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी कंपनीतील पदांचे राजीनामे दिले होते. इंदूर येथे दिल्लीहून आलेल्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली. कक्कड यांच्या विजय नगर भागातील निवासस्थानी छापे टाकून इतर संबंधित ठिकाणांचीही झडती घेण्यात आली. कक्कड यांचे भोपाळमधील निवासस्थान आणि इतर काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. तेथून जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी सुरू आहे. कोलकाता येथील उद्योगपती पारमल लोढा यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. कक्कड मध्य प्रदेशचे माजी पोलीस अधिकारी असून त्यांना काँग्रेसप्रणीत सरकारने सत्तेवर येताच मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी म्हणून नेमले होते. त्यांनी याआधी केंद्रीय मंत्री कांतीलाल भुरिया यांचे विशेष अधिकारी म्हणून काम केले आहे. कक्कड यांचे कुटुंबीय आतिथ्य व्यवसायात आहेत.

सक्तवसुली संचालनालयाने ३६ हजार कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाप्रकरणी रतुल पुरी यांचे दिल्लीत जाबजबाब घेतले होते.