कर्नाटकचे माजी डीजीपी एच. टी. सांगलियाना यांनी निर्भयाची आई आशा देवी यांच्या सौंदर्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावर आता आशा देवी यांनी प्रतिक्रीया दिली आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करण्याऐवजी आमच्या लढाई आणि संघर्षाबाबत ते बोलले असते तर चांगले झाले असते. अशा वक्तव्यावरुन हे लक्षात येते की, आपल्या समाजाची मानसिकता अद्यापही बदललेली नाही, असे आशा देवी यांनी म्हटले आहे.


कर्नाटकची राजधानी बंगळुरुत महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना एचटी सांगलियाना यांनी निर्भयाच्या आईविषयी बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. बंगळुरु मिररने दिलेल्या वृत्तानुसार, माजी डीजीपी एचटी सांगलियाना म्हणाले होते की, २०१२ मध्ये दिल्लीत निर्भयावर पाशवी अत्याचार करण्यात आले होते. मृत्यूशी तिने दिलेली झुंज अखेर अपयशी ठरली होती आणि तिचा मृत्यू झाला होता. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आशा देवी यांनी संघर्षमय कायदेशीर लढा द्यावा लागला. ‘मी निर्भयाच्या आईला पाहू शकतो. त्यांच्याकडे किती चांगली शरिरयष्टी आहे. त्यांच्याकडे पाहूनच निर्भया किती सुंदर असेल याचा अंदाज लावू शकतो’.

एचटी सांगलिया इतक्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले की, ‘जर तुमच्यावर जबरदस्ती होत असेल तर तुम्ही आत्मसमर्पण केले पाहिजे. नंतर तुम्ही ती केस फॉलो करा. सुरक्षित राहण्याचा, जीव वाचवण्याचा आणि हत्या रोखण्याचा हा पर्याय आहे’.

सांगलिया यांच्या या वक्तव्यावरुन बरीच खळबळ माजली होती. सर्व बाजूंनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली जात आहे. दरम्यान, निर्भयाच्या आईने यावर समाजाची अजूनही मानसिकता बदलली नसल्याचे सांगत यावर नाराजी व्यक्त केली आहे.