News Flash

YouTube वर रेसिपी चॅनेल सुरु केल्याने गँगस्टर लागला पोलिसांच्या हाती; सात वर्षांपासून होता फरार

२०१४ पासून तो फरार होता

(फोटो सौजन्य: रॉयटर्सवरुन साभार)
इटलीमधील एका फरार गँगस्टरला पोलिसांनी सात वर्षानंतर अटक केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सात वर्षांपासून फरार असणारा हा मोस्ट वॉण्टेड गँगस्टर सध्या युट्यूबवर एक लोकप्रिय रेसिपी चॅनेल चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. डॉमनिका रिपब्लिकमधून स्टेनली टुची या गँगस्टरला पोलिसांनी अटक केली आहे. इटलीमधील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीचं खरं नाव मार्क फिरीन कॅल्यु बायार्ट असं आहे. मागील सात वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर आहेत. मात्र बायार्ट स्टेनली टुची नावाने डॉमनिका रिपब्लिकमध्ये एक युट्यूब चॅनल चालवत होता. इटालियन पदार्थ बनवण्यासंदर्भातील व्हिडीओमुळे तो चांगलाच लोकप्रिय झाला होता असं एनबीसी न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. आपल्या पत्नीच्या मदतीने बायार्ट हे चॅनल चालवत होता. या गँगस्टरला जेवण बनवायची आवड असल्याने आणि त्याच्या दंडावर असणाऱ्या टॅटूमुळे त्याची ओळख पटली असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

बायार्ट स्टेनली नावाने व्हिडीओ करताना आपला चेहरा झाकून घ्यायचा. मात्र व्हिडीओंदरम्यान त्याच्या दंडावरील टॅटू स्पष्टपणे दिसून यायचे. याच टॅट्यूच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून बायार्टला अटक केली. युरोपमधील डॅरेनगॅट क्राइम सिण्डीकेटशी बायार्टचे संबंध असल्याचा पोलिसांचा संक्षय आहे. ही गँग युरोपमधील सर्वात मोठी गँग असून इटलीच्या किनारी भागामध्ये या गटाची दहशत आहे. २०१४ साली नेदरलॅण्डमधून इटलीमध्ये कोकन आणल्याप्रकरणी बायार्ट फरार होता. तो इटलीमधील मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीमध्ये होता. बायार्ट हा ५३ वर्षांचा आहे. तो मागील पाच वर्षापासून डॉमनिका रिपब्लिकमध्ये वास्तव्यास होता. तसेच या कालावधीमध्ये तो अगदी गुप्तपणे आपल्या गुन्हेगारी विश्वाशी संबंध ठेऊन होता. इंटरनेटवर तो रेसिपी व्हिडीओंसाठी लोकप्रिय होता. डॉमनिका रिपब्लिकमध्ये बायार्ट मार्क नावाने लोकप्रिय होता. इटलीमधून येणाऱ्या पर्यटकांनी आपल्याला ओळखू नये म्हणून बायार्ट अनेकदा पर्यटनस्थळी जाणं टाळायचा.

मागील सात वर्षांपासून पोलिसांनी बायार्टचा शोध घेणं थांबवलं नव्हतं अशी माहिती इटली पोलिसांनी एनबीसी न्यूजला दिली आहे. बायार्टचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पत्नीच्या युट्यूबवरील हलचालींवर लक्ष ठेवलं होतं. यापूर्वी बायार्टने काही हॉटेलमध्ये काम केल्याची माहिती असल्याने व्हिडीओ पाहिल्यावर मार्क हाच बायार्ट असल्याची खात्री पोलिसांना पटली. डॉमनिका रिपब्लिकमधील बोका चिका शहरातून बायार्टला अटक करण्यात आली असून सोमवारी त्याला इटलीमधील मिलान शहरामध्ये आणण्यात आलं. बायार्टने या वर्षाच्या सुरुवातीलाच युट्यूब चॅनेल सुरु केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 10:40 am

Web Title: italian mafia fugitive caught in dominican republic after police find youtube cooking show scsg 91
Next Stories
1 अरररर घोळ झाला! भाजपाच्या प्रचार व्हिडीओत चिदंबरम यांच्या सुनेची डान्स क्लिप
2 नवऱ्याने वर्षभरापासून सेक्स न केल्याने महिलेने दाखल केला एफआयआर
3 पत्नीसोबत जबरदस्ती होळी खेळण्यावर आक्षेप घेणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याची हत्या; मोदींच्या मतदारसंघातील घटना
Just Now!
X