केरळमधील मच्छिमारांच्या हत्येप्रकरणातील आरोपी इटलीतील दोन नाविकांवर भारतीय दंडविधान संहितेतील कलम ३०२ बरोबरच नाविकांसंदर्भातील कायद्यातील आणखी कडक कलम लावण्याचा विचार राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करीत आहे. ही कलमे न्यायालयात सिद्ध झाल्यास या दोन्ही नाविकांना फाशीची शिक्षाही सुनावली जाऊ शकते.
‘अनलॉफूल ऍक्टस अगेन्स्ट सेफ्टी ऑफ मारिटाइम नॅव्हिगेशन ऍंड फिक्स्ड प्लॅटफॉर्म ऑन कॉंटिनेंटल शेल्फ ऍक्ट, 2002’ मधील कलम ३ अ (१) नुसार कोणत्याही व्यक्तीने दुसऱया व्यक्तीची हत्या केल्यास त्याला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आतापर्यंत या प्रकरणातील आरोपी मॅसिमिलानो लॅटोर आणि सॅल्वाटोर गिरोन यांच्यावर आयपीसीतील कलम ३०२ खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास एनआयएकडे आल्यानंतर आता या संपूर्ण प्रकरणाची नव्याने चौकशी केली जाणार आहे. याप्रकरणी एनआयएकडून अजून प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झालेला नाही. तो दाखल झाल्यानंतर एनआयएकडून दोन्ही नाविकांची चौकशी करण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शी आणि पीडित मच्छिमारांच्या नातेवाईकांशीही चर्चा करण्यात येईल.
दरम्यान, इटलीचे भारतातील राजदूत डॅनिअल मॅनकिनी यांच्या भारत सोडण्यावर घालण्यात आलेले निर्बंध सर्वोच्च न्यायालयाकडून मंगळवारी उठविण्यात आले. त्यांच्यावर घातलेले सर्व निर्बंध उठविण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.