केरळमध्ये दोन मच्छीमारांची गोळ्या मारून हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेल्या इटलीच्या साल्वातोरी गिरोनी या नौसैनिकाच्या जामीन अटी शिथिल करण्याच्या अर्जावर सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे. आंतरराष्ट्रीय लवादाने भारत व इटली यांच्यातील न्यायक्षेत्राच्या वादाबाबत निकाल देईपर्यंत आपल्याला मायदेशी जाऊ द्यावे, अशी विनंती गिरोनी याने केली असून त्यावर २६ मे रोजी सुनावणी होणार आहे. न्या. पी.सी.पंत व न्या. डी.वाय.चंद्रचूड यांनी या प्रकरणी गुरुवारी सुनावणी ठेवली आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी केंद्राची बाजू मांडताना सांगितले, की दुसरा नौसैनिक मॉसिमिलाने लाटोरी याला मायदेशी पाठवताना ज्या आधारावर अटी शिथिल केल्या होत्या, त्या आधारावर गिरोनी याला जामिनासाठी अटी शिथिल करण्यास सरकारचा विरोध नाही. लाटोरी हा सध्या इटलीत असून त्याचे तेथील वास्तव्य सर्वोच्च न्यायालयाने ३० सप्टेंबपर्यंत वाढवून दिले आहे. गिरानी हा इटलीच्या दूतावासात सध्या राहत आहे. लवादाचा निर्णय होईपर्यंत आपल्याला मायदेशी जाऊ द्यावे अशी विनंती त्याने केली आहे. इटलीच्या नौसैनिकांवर खटले भरण्याच्या अधिकाराबाबत भारत व इटली यांनी वेगवेगळे दावे केले आहेत. गिरोनी याने वकील जगजित सिंग छाब्रा यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली असून गृहमंत्रालयास देशाबाहेर जाण्यासाठी व्हिसा देण्याची मागणी केली आहे. विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना आपल्याला मायदेशी जाण्याची परवानगी असल्याच्या पूर्वसूचना देण्यात याव्यात, असेही अर्जात म्हटले आहे.