भारतीय कायद्याच्या कचाटय़ात तसेच राजकीय निवडणुकीच्या रणधुमाळीत अडकण्यापूर्वीच दोन भारतीय मच्छीमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या इटलीच्या नौसैनिकांविरोधातील प्रकरण तीन दिवसांत निकाली काढण्याची गरज होती. मात्र तसे न झाल्यामुळे प्रकरणाचा गुंता  वाढल्याची नाराजी इटलीने व्यक्त केली आहे.
प्रकरण घडल्यानंतर तीन दिवसांतच तोडगा काढण्याची योग्य वेळ होती, असे मत इटली सरकारच्या विशेष प्रतिनिधी स्तेफन दे मिसुरा यांनी व्यक्त केले आहे.
१५ फेब्रुवारी २०१२ रोजी घडलेल्या या प्रकरणात दोन नौसैनिक तब्बल दोन वर्षे अडकून पडल्याची कल्पनाच कोणी करू शकत नाही, असे मत मिसुरा यांनी या प्रकरणात होणाऱ्या आगामी सुनावणीच्या पाश्र्वभूमीवर म्हटले आहे. मच्छीमारांच्या हत्येप्रकरणी इटलीच्या दोन नौसैनिकांविरोधात मंगळवारी भारतीय सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
इटलीच्या नौसैनिकांनी फेब्रुवारी २०१२ मध्ये केरळच्या किनारपट्टी भागात इटलीच्या नौसैनिकांनी दोन भारतीय मच्छीमारांची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेनंतर भारत आणि इटली यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
भारताने या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे दिला आहे. गेल्याच आठवडय़ात भारताने इटलीच्या नौसैनिकांना फाशीची शिक्षा देण्याची शक्यता फेटाळून लावली. मात्र भारताने सागरी चाचेविरोधी कायद्याअंतर्गत इटलीच्या नौसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करून खटला सुरू केला आहे. या प्रकरणात दोन्ही नौसैनिकांना दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.