भारतात वास्तव्याला असलेल्या इटलीतील नागरिकांनी अधिक दक्ष आणि सतर्क राहावे, असा सल्ला तेथील सरकारने या नागरिकांना दिला आहे. दोघा भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याचा आरोप असलेल्या इटलीच्या दोन नौसैनिकांना भारतात पाठविण्यास इटलीने नकार दिल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर इटली सरकारने सदर सल्ला दिला आहे.
दोघा नौसैनिकांना भारतात पाठविण्यात येणार नाही, असे इटलीने भारताला अधिकृतपणे कळविल्यानंतर दोनच दिवसांनी नागरिकांना हा सल्ला देण्यात आला असून त्यांना गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
नौसैनिकांविरोधातील निदर्शनांच्या वेळी इटलीच्या नागरिकांनी सतर्क राहावे, असा सल्ला इटलीच्या दूतावासाने दिला आहे. नौसैनिकांना भारतात आणण्याचे आश्वासन न पाळल्याने सर्वोच्च न्यायालयाने इटलीचे भारतातील राजदूत डॅनियल मॅन्सिनी यांना परवानगीविना देश सोडण्यास मज्जाव केला आहे.
दरम्यान, भारताने इटलीशी राजनैतिक संबंध कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भारताचे इटलीतील प्रस्तावित राजदूत पुढील आठवडय़ात रोम येथे कार्यसूत्रे स्वीकारणार होते. तथापि, त्यांना तेथे पाठविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.