भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमध्ये सहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा, राजनैतिक संबंध, उर्जा, सांस्कृतिक सहकार्य, दोन्ही देशांमधील परराष्ट्र मंत्रालय आणि गुंतवणूक अशा सहा करारांचा यात समावेश आहे.

इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी हे एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून जवळपास दशकभरानंतर इटलीचे पंतप्रधान भारतात आले आहेत. सोमवारी दिल्लीत जेंटिलोनी यांचे राष्ट्रपती भवनात शाही स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम जेंटिलोनी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नरेंद्र मोदी आणि पाओले जेंटिलोनी यांनी भारतातील १२ आणि इटलीतील १९ उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत चर्चा केली. आर्थिक आणि गुंतवणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सहा करारांवर स्वाक्षरी केली.

नरेंद्र मोदी आणि पाओले यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. यात मोदी म्हणाले, भारत आणि इटली हे दोन्ही देश द्विपक्षीय संबंधाना नव्या उंचीवर नेण्यास इच्छुक आहेत. दहशतवादविरोधात आणि सायबर सुरक्षेबाबत दोन्ही देश एकत्र येऊन लढा देतील, असे त्यांनी सांगितले. पर्यटन आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील संवाद वाढवण्यावर भर देणार असेही मोदी म्हणालेत. स्मार्ट सिटी, फूड प्रोसेसिंग, फार्मासिटीकल आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातील सरकारी प्रकल्पात इटलीने दिलेल्या सहकार्याबद्धल मोदींनी इटलीचे आभारही मानले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास आम्ही इच्छुक आहोत. याशिवाय देशातील विद्यार्थी उच्चशिक्षणासाठी इटलीला पसंती दर्शवतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.