गेल्या वर्षी इटलीमध्ये करोनाने थैमान घातल्या नंतर अनेक पिढ्यांनी पाहिली नाही अशी भयंकर स्थिती तिथे निर्माण झाली होती. अवघी सहा कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये करोनाच्या सुरुवातीच्या काळात जगभरात झालेल्या मृत्यूंपैकी सर्वाधिक संख्या होती. त्याच इटलीमध्ये आता मास्क घालणे अनिवार्य नसणार आहे. इटलीमध्ये, २८ जूनपासून मास्क घालणे बंधनकारक नसणार आहे आणि संपूर्ण देश मास्क फ्री होणार आहे.

गेल्या वर्षी युरोपमधील इटलीमध्ये करोनामुळे हाहाकार माजला होता. त्यानंतर आता इटलीने करोनावर मात करत मास्क पासून मुक्तता मिळवली आहे. देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. आरोग्यमंत्री रॉबर्टो स्पेरन्झा यांनी फेसबुकवर व्हायरस किती वेगाने पसरत आहे याबद्दल लिहिले आहे. यासाठी इटलीमध्ये वर्गीकरण प्रणाली तयार केली गेली आहे. यानुसार व्हाईट झोनमधील लोकांना आता मास्क घालण्याची गरज भासणार नाही असे म्हटले आहे.

हे ही वाचा >> Coronavirus: इटलीने करोनाग्रस्त वृद्धांना मरायला सोडून दिलंय का? वाचा खरं काय आहे…

देशाच्या वर्गीकरण प्रणालीमध्ये वायव्येकडील एओस्टा व्हॅली वगळता सर्व इटालियन प्रदेश समाविष्ट आहेत. इटलीच्या कोमिटाटो टेकनिको सायंटिफो (सीटीएस) वैज्ञानिक सल्लागार पॅनेलच्या सल्ल्यानुसार रॉबर्टो स्पेरन्झा यांनी ही घोषणा केली. ज्या ठिकाणी व्हायरसचा वेगवान प्रसार होण्याचा धोका आहे अशा ठिकाणी लोकांना सध्या मास्क लावणे अनिवार्य नसणार  आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याची आवश्यकता असू शकते. जगातील अनेक देशांत असेच निर्णय घेण्यात आले आहेत असे यामध्ये म्हटले आहे.

इटलीमधील १.२ कोटी लोकांचे लसीकरण

२८ जूनपर्यंत इटलीतील सर्व भाग हे ‘व्हाइट’ झोन म्हणून घोषीत केले जातील असे तज्ज्ञांचे मत आहे. सोमवारी, इटलीमध्ये करोनाचे केवळ ४९५ नवीन रुग्ण आढळून आले. तर २१ लोकांचा मृत्यू झाला. २०२० च्या सुरुवातीला इटलीमध्ये करोनाव्हायरसचा प्रसार झाल्यापासून, देशातील मृतांची संख्या १ लाख २७ हजार २९१ झाली आहे. ४२.५ लाख नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. आतापर्यंत, १२ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येच्या ३० टक्के लोकांना लसी दिली गेली आहे. सहा कोटी लोकसंख्या असलेल्या इटलीमध्ये त्यांचा वाटा १.२ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे.

हे ही वाचा >> Coronavirus: इटलीच्या रस्त्यांवर पडून आहेत शेकडो मृतदेह ? जाणून घ्या व्हायरल फोटोमागील सत्य

गेल्या वर्षी करोनाने घातले होते थैमान

लॉकडाउनच्या घोषणेनंतर इटलीतील नागरिकांनी याचे पालन केलं नाही. लॉकडाउन असतानाही इटलीमधील अनेक शहरांमध्ये लोकं खरेदीसाठी बाहेर पडले. हॉटेलिंग, बार आणि क्लबमध्ये रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्या, रात्री उशीरापर्यंत सुरु असलेले बाजार असं चित्र लॉकडाउनच्या काळात इटलीमध्ये होते. इटलीमधील लॅम्बार्डी या भागामध्ये करोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव झाला आहे. येथेही लॉकडानचे नियम पाळण्यात आले नाही. राज्य सरकारनेच लॉकडाउन गांभीर्याने न घेतल्याची कबुली दिली होती. लष्कराच्या मदतीने लोकांना बळजबरीने घरात राहण्यास भाग पाडलं गेलं. मात्र त्या आधीच करोनाचा वेगाने प्रसार झाला होता.