भारताच्या हद्दीत चीन सातत्याने घुसखोरी करत आहे. गेल्या एका महिन्यात लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चिनने सर्वाधिक घुसखोरी केली. गेल्या ३० दिवसांमध्ये चीनच्या सैन्याने तब्बल ३५ वेळेस LAC पार केली. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) विरोध केल्यानंतर चिनी सैन्य परतलं. आयटीबीपीच्या अहवालात याबाबत खुलासा झाला असून आजतकने याबाबत वृत्त दिलं आहे. आयटीबीपीने गृह मंत्रालयाला हा अहवाल पाठवला आहे.

या वृत्तानुसार, चीनने या महिन्यातच उत्तर लडाखमध्ये सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास १४ किमी भारतीय क्षेत्रात घुसखोरी केली. पण आयटीबीपीने त्यांना परतण्यास भाग पाडलं. लडाखच्या ट्रिग हाईटमध्ये मार्च महिन्यात १८ मार्च, २१ मार्च, २४ मार्च आणि ३० मार्च रोजी दोनवेळेस ८ किमीपर्यंत चिनी सैन्य घुसलं होतं. लडाखच्या ट्रॅक जंक्शन येथे चिनच्या दोन हेलीकॉप्टरने घुसखोरी केली. भारताच्या हवाई हद्दीत १८ किलोमीटरपर्यंत हेलीकॉप्टर घुसले होते.

त्यानंतर २९ आणि ३० मार्च रोजी चीनचं सैन्य अरुणाचल प्रदेशच्या असफिला परिसरात ४ किलोमीटर आतमध्ये घुसलं होतं, असं आयटीबीपीने गृह मंत्रालयाला दिलेल्या अहवालात म्हटलं असल्याचं आजतकने वृत्त दिलं आहे. २२ मार्च रोजी अरुणाचलच्या डिचु येथे चीनचं सैन्य २५० मिटर आतपर्यंत घुसखोरी करून आलं. मात्र, आयटीबीपीसोबत त्यांची बाचाबाची झाली आणि काही तासांनी त्यांचं सैन्य परतलं. 28 मार्चला लद्दाखच्या डेसपांग परिसरात १९ किलोमीटरपर्यंत भारतीय सीमेत दाखल झाल्यानंतर चिनी सैन्य परतलं.

इतकंच नाही तर गेल्या १७ दिवसांमध्ये तीन वेळेस चिनी सैन्याचं हेलीकॉप्टर भारताच्या हवाई हद्दीत घुसलं होतं. लडाखच्या डेपसांग परिसरात चीनने सातत्याने घुसखोरी केली आहे. १७ मार्च, २२ मार्च, २३ मार्च, २८ मार्च आणि १ एप्रिल रोजी १० ते १९ किमीपर्यंत चीनने घुसखोरी केली होती असं आयटीबीपीने गृह मंत्रालयाला दिलेल्या अहवालात म्हटलं आहे.

गेल्या महिन्यात २१ मार्च रोजी चिनी सैन्याचे ४ हेलीकॉप्टर लडाखच्या ट्रिग हाईट आणि डेसपांग परिसरात १७ किमीपर्यंत आत आले होते. त्यानंतर २७ मार्च रोजी पुन्हा दोन हेलीकॉप्टर लद्दाखमध्ये ४ किमीआतमध्ये घुसले होते.

रणनितीच्या दृष्टीकोनातून लडाखमधील ट्रिग हाईट आणि डेपसांग परिसर भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. त्यामुळेच येथे सातत्याने घुसखोरी करुन दबाव आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे.