झारखंडमध्ये विवाहित महिलेवर १७ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झारखंडमधील डुमका येथे ही घटना घडली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली असून इतर १६ जण फरार आहेत. दरम्यान आरजेडी नेता शिवानंद तिवारी यांनी आदिवासी भागात बलात्कार होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती सांगत आश्चर्य व्यक्त केलं आहे. ते एएनआयशी बोलत होते.

“आदिवासी भागात मुलगी किंवा महिलेवर बलात्कार होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. आदिवासी संस्कृतीत बलात्काराला स्थान नाही. पण जेव्हापासून आधुनिक समाजाच्या नावे जी संस्कृती सुरु झाली आहे त्यामध्ये महिलेला उपभोगाचं साधन म्हणून दर्शवलं आहे. चित्रपटातील आयटम डान्स, जाहिरातील, मोबाइल फोनमधील पॉर्न फोटो या सगळ्या गोष्टी बलात्काराची मानसिकता निर्माण करत आहेत,” असं शिवानंद तिवारी यांनी म्हटलं आहे.

धक्कादायक! पतीसमोर १७ जणांनी पत्नीवर केला सामूहिक बलात्कार

“आदिवासी भागात हे पोहोचणं म्हणजे समाजातील तळापर्यंत पोहोचलं आहे. जोपर्यंत बलात्काराची मानसिकता निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत तोपर्यंत त्याच्यावर नियंत्रण कसं आणणार. निर्भयासारख्या घटनानंतर कायदे करण्यात आले. पण आम्ही त्यावेळीही सांगितलं होतं की शिक्षा वाढवल्याने या गोष्टी थांबतील हा गैरसमज आहे. जोपर्यंत बलात्कारासारखी उकसवणाऱ्या गोष्टी आहेत तोपर्यंत ते थांबणार नाही आणि आजही माझं तेच म्हणणं आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

झारखंडमध्ये बलात्कार झालेली पीडित महिला पाच मुलांची आई आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पतीसोबत आपण बाजारातून परतत असताना सर्व १७ आरोपी तिथे हजर होते. त्यांनी आम्हाला थांबवलं. ते सर्व दारुच्या नशेत आहेत. त्यांनी माझं अपहरण केलं आणि ओढत जवळच्या झाडीत नेलं. यावेळी इतरांनी पतीला धरुन ठेवलं होतं. यानंतर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला”.

पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. इतर १६ आरोपी फरार आहेत. डीआयजी सुदर्शन मंडल यांनी एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही असं सांगितलं आहे.