कर्नाटकातील तुरूंगात नर्तिकेचा नाचगाण्याचा कार्यक्रम केल्याप्रकरणी तुरुंग प्रशासनाचे दोन अधिकारी आणि एका पोलीस अधिकाऱयाला निलंबित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनी कर्नाटकातील ‘दरगा’ तुरुंगात ‘आयटम साँग’वर नर्तिकेच्या नाचगाण्याचा कार्यक्रम झाल्याचा प्रकार प्रसिद्धी माध्यमांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आणला. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेऊन तुरूंगाचे अधीक्षक पी.एस.आंबेकर, वॉर्डन संपत आणि हेड कॉन्स्टेबल गुंडाली यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती विजयपुरा जिल्हा पोलीस अधीक्षक सिद्दरमप्पा यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

प्रजासत्ताक दिनी ‘दरगा’ तुरूंगातून ३८ कैद्यांची चांगल्या वागणुकीच्या पार्श्वभूमीवर सुटका करण्यात आली. यानिमित्ताने तुरूंगात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमात नर्तिकेला बोलावून ‘आयटम नंबर’ पेश करण्यात आला. तसेच नोटांचीही उधळपट्टी झाल्याचे व्हिडिओतून उघडकीस आले. प्रसिद्धी माध्यमांनी हा व्हिडिओ प्रसारित करताच पोलीस प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आणि तीन अधिकारय़ांना निलंबित केले गेले