आयकर परताव्याचा अर्ज भरताना अनेक करदात्यांना समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामुळे ही क्लिष्ट पद्धत संपवण्याचा सरकारचा विचार आहे. लोकांची ही समस्या दूर करण्यासाठी एका वेगळ्या पर्यायाबाबत सरकारचा विचार सुरू आहे. नव्या योजनेनुसार, आयटीआर भरताना केवळ तुम्हाला स्वाक्षरी करण्याची गरज असेल, उर्वरित काम आयकर विभाग करेल. केंद्रीय कर संचालक मंडळाचे(सीबीडीटी) चेअरमन सुशील चंद्रा यांनी याबाबत माहिती दिलीये.

यानुसार, आयकर परतावा भरणाऱ्यांना लवकरच आधीपासूनच भरलेला फॉर्म मिळेल, त्यामुळे परतावा भरण्याची प्रक्रिया सरळ आणि सोपी होईल. आयकर विभागाकडून कर्मचारी किंवा बँकेसारख्या अन्य संस्थांद्वारे टीडीएसच्या आधारे आधीपासूनच भरलेल्या फॉर्मची प्रणाली तयार करण्यावर काम सुरू आहे. फॉर्म भरणाऱ्या करदात्याला जर आधीपासूनच भरलेल्या फॉर्ममध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटल्यास त्यात एडिटचा पर्याय देखील मिळेल, त्यामुळे आवश्यक बदल करुन त्याला परतावा भरता येईल.

‘अशाप्रकारच्या एखाद्या व्यवस्थेने जे नागरीक आताच्या कठीण प्रक्रियेचं कारण देत आयकर परतावा भरत नाहीत ते आयकर भरण्यासाठी प्रेरित होतील. करदात्यांना सोपी-साधी प्रक्रिया उपलब्ध करुन देण्याचा आय़कर विभागाचा प्रयत्न आहे. आयकर परताव्याची प्रक्रिया अत्यंत जलदगतीने करण्याचा आमचा विचार आहे. या बदलासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो’, असं चंद्रा म्हणाले.