अमेरिकेतील कोलंबिया प्रांताची राजधानी बोगोटा येथून जर्मनीतील फ्रॅंकफर्ट येथे जाण्यासाठी लुफ्तांसाच्या विमानाने १९१ प्रवाशांसह उड्डाण केले. प्रवासादरम्यान हे विमान इंग्लंडमधील मॅंचेस्टर विमानतळावर उतरले तेव्हा या विमानातून एक अधिकचा प्रवाशी बाहेर पडला. तुम्हाला याचे नक्कीच आश्चर्य वाटले असेल. पण, हो हे खरे असून हा अधिकचा प्रवासी विमानात आला कसा, याचे कारण असे की, या विमान प्रवासादरम्यान एका बाळाने जन्म घेतला. त्यामुळे एका अधिकच्या प्रवाशाची नोंद विमानाच्या क्रू मेंबर्सने केली.


हवाई प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाल्याच्या काही घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मात्र, अशा घटना खूपच दुर्मिळ असतात. लुफ्तांसाच्या फ्लाईटमध्येही अशीच सुखद घटना घडली, त्यानंतर या गोष्टींचा विमानातील प्रवाशांसह क्रू मेंबर्स आणि अधिकाऱ्यांनाही आनंद झाला होता. यावेळी ‘अभिनंदन मुलगा झाला’, अशी थेट घोषणाच विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली. हे विमान आटलांटिक महासागरावरून जात असताना तब्बल ३९ हजार फूट उंचीवर या बाळाने जन्म घेतल्याने सर्वांनाच त्याचे कौतुक वाटत होते. बुधवारी २६ जुलै रोजी लुफ्तांसाच्या एलएच ५४३ या विमानात हा प्रकार घडला.


विमानात ३८ वर्षीय देसीस्लावा के. ही महिला झोपी गेली आणि काही वेळात या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. मात्र, योगायोगाने या विमानात तीन डॉक्टर्स उपलब्ध होते. यावेळी येथील काही क्रू मेंबर्सने मागच्या काही प्रवाशांना पुढे जाण्यास सांगितले आणि मागची जागा या महिलेच्या प्रसुतीसाठी तयार केली. त्यानंतर सुरक्षित प्रसुतीसह कुठल्याही अडचणींशिवाय बाळही सुखरूप जन्मले. त्यामुळे देसीस्लावाने सर्व मदतकर्त्यांचे आभार मानले. तसेच आपल्या बाळाचे नामकरणही तिने निकोलाई असे केले. आपल्यावर योग्य उपचार करणाऱ्या डॉक्टरचेच नाव तिने आपल्या मुलाला दिले.

या नंतर या विमानाच्या पायलटनेही या नवजात बालकासाठी आणि त्याच्या आईच्या सुरक्षेसाठी ईमर्जन्सी लॅडिंगचा निर्णय घेतला आणि विमान मॅंचेस्टर विमानतळावर उतरवले. या घटनेनंतर विमानाचे कॅप्टन कुर्त मायेर यांनी सांगितले की, माझ्या ३७ वर्षांच्या सेवेत असा प्रसंग कधीही आला नव्हता. मात्र, या परिस्थितीतही सर्वच क्रू मेंबर्सने केलेल्या उत्कृष्ट कामाचे त्यांनी कौतुक केले.

विमानात बाळाचा जन्म होणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असली तरी, लुफ्तांसाच्या विमानांमध्ये १९६५ पासून बाळाचा जन्म होण्याची ही ११वी वेळ आहे. यापूर्वी जेट एअरवेजच्या विमानात पहिल्यांदाच एका बाळाने जन्म घेतला होता, त्या बाळाला विमान कंपनीने खास सवलत दिली आहे. या बाळासाठी जेट एअरवेजचा विमान प्रवास हा आजीवन काळासाठी मोफत असणार आहे.