16 January 2021

News Flash

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘तो’ निर्णय घेण्यासाठी पाकने आणला दबाव; भारताचा आरोप

बनावट खटल्याच्या माध्यमातून फाशीची शिक्षा; परराष्ट्र मंत्रालयाचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

पाकिस्तानमध्ये तथाकथित हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधन यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती पाकिस्तानकडून देण्यात आली होती. तसंच त्यांना दुसरा कॉन्सुलर अॅक्सेस देण्याचा प्रस्तावही दिल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. परंतु भारतानं याप्रकरणी प्रतिक्रिया देत पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांच्यावर दबाव आणत तो निर्णय घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.

“कुलभूषण जाधव प्रकरणातील एफआयआर, पुरावे, न्यायालयाच्या आदेशासह कोणतीही संबंधित कागदपत्रे भारताला देण्यास पाकिस्तानने नकार दिला. कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तान आयसीजेच्या निर्णयाचे पालन करण्याचा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करेल,” असं परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

“आंतरराष्ट्रीय न्याय कायद्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा अधिकार जाधव यांना नाकारण्यास पाकिस्ताननं भाग पाडलं आहे,” असा दावा परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला. “तसंच पाकिस्तान ढोंगीपणा करत असून त्यांच्या दबावामुळेच कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानी माध्यमांतील वृत्तांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं की, “बनावट खटल्याच्या माध्यमातून जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. इतकेच नव्हे तर त्यांना आपल्या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार देण्यास भाग पाडलं गेलं होतं.” भारताने जाधव यांच्या चर्चेसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. तसंच अनेकदा मागणी करूनही जाधव यांच्यापर्यंत पोहोचू दिलं जात नसल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

२०१६ मध्ये अटक

तथाकथित हेरगिरी आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांवरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात भारताने थेट नेदरलँडमधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. “जाधव यांच्या प्रकरणाचा आणि दिलेल्या शिक्षेचा आढावा घेऊन फेरविचार करण्यात यावा. तसेच विलंब न करता त्यांना भारतीय दूतावासाची मदत देण्यात यावी”, असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं त्यांना अटक केल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे जाधव यांचं इराणमधूनच अपहरण केल्याचा दावा भारतानं केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 8:58 am

Web Title: its a farce india says kulbhushan jadhav coerced by pakistan into refusing to file review petition pakistan jail jud 87
Next Stories
1 दहशतवाद संपेपर्यंत ही लढाई सुरूच राहिल : प्रकाश जावडेकर
2 “चीनच्या आक्रमकतेला भारताने सर्वोत्तम उत्तर दिलं”; अमेरिकेकडून शाब्बासकी
3 टिकटॉक, पबजीसह ‘हे’ ८९ अ‍ॅप्स मोबाइलमधून काढून टाका, भारतीय जवानांना आदेश; वाचा संपूर्ण यादी
Just Now!
X