देशातील जनतेसमोर सक्षम राजकीय पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणं ही सध्या राष्ट्रीय गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भातील काम सुरुही झालं होतं मात्र करोनाच्या संकटामुळे ते लांबणीवर पडल्याचा खुलासाही पवरांनी केला आहे. इतकचं नाही तर देशातील जनतेसमोर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन पर्याय देण्याचं काम करणार असतील तर या कामासाठी मला कोणालाही भेटायला आणि चर्चा करायला कसलाही कमीपणा वाटणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं आहे. पवारांच्या ‘एक शरद सगळे गारद’ या मुलाखतीचा तिसरा आणि शेवटचा भाग आज प्रदर्शित झाला. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खास मुलाखत घेतली असून या मुलाखतीतच पवारांनी देशात राजकीय पर्याय देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> चीन प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवारांचा मोदी सरकारला सल्ला, म्हणाले…

“देशामध्ये विरोधी पक्षाला जाग आलेली दिसत नाहीय. अनेक प्रश्नांमध्ये विरोधी पक्ष हा विखुरलेला आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका फार महत्वाची असते. आपण स्वत: विरोधी पक्ष नेता होता. राज्यात तसेच संसदेमध्येही विरोधी पक्ष नेता होता तुम्ही. हा विरोधी पक्ष भविष्यामध्ये एकत्र येऊन काही देशासमोर चांगलं काम ठेऊ शकतो का? जसं जनता पक्ष निर्माण झाला. एक आवाहन उभं राहिलं होतं. अशी काही शक्यता आपल्याला भविष्यामध्ये वाटते का?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी पवारांना विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना पवारांनी विरोधी पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्यासंदर्भात काम सुरु होतं तितक्यात करोनाचं संकट आल्याने हे काम लांबणीवर पडल्याची माहिती दिली.

नक्की वाचा >> “मी मोदींच्या चेंबरमध्ये गेलो आणि त्यांना सांगून आलो की…”; राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात पवारांचा खुलासा

संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर …

“आज देशातील विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांमध्ये एक भावना अशी आहे की आपण एकत्र बसून एक निश्चित कार्यक्रम ठरवला पाहिजे. आज देशवासियांसमोर एक पर्याय दिला पाहिजे. आणि तो पर्याय देण्याची कुवत आजच्या विरोधी पक्षांमध्ये आणि त्यांच्या ऐक्यात निश्चित आहे. पण सर्व लक्ष करोनाकडे वळवल्यामुळे हे (एकत्र येण्यासंदर्भातील) काम दूर्लक्षित झालं. निवडणुका झाल्यानंतर करोनाचं संकट येण्यापूर्वी देशातील विरोधी पक्षाचे लोकांनी एकत्र बसून चर्चा केल्या. काही गोष्टींच्या बाबतीत धोरणं ठरवण्याचा विचार केला. त्यानंतर करोनामुळे हे सगळं चित्र बदललं,” असं पवारांनी विरोधक एकत्र येण्यासंदर्भातील हलचाल सुरु असल्याचे सांगताना स्पष्ट केलं. “पण माझी खात्री आहे मला स्वत:ला असं वाटतं की हे करोनाचं संकट कमी झालं आणि संसदेचं कामकाज सुरु झाल्यानंतर देशातील सर्व विरोधी पक्षातील लोकांना एकत्र करण्याबद्दलची भूमिका घ्यावी लागेल,” असं मत पवारांनी मांडलं.

नक्की वाचा >> …म्हणून आम्ही २०१४ साली भाजपाला बाहेरुन पाठिंबा दिला : शरद पवार

तुम्ही पुढाकार घेणार का?

विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्याची गरज आहे असं पवारांनी म्हटल्यानंतर “तुम्ही यासाठी पुढाकार घेणार का?” असा प्रश्न राऊत यांनी विचारला. “माझ्यासारखी व्यक्ती यामध्ये अधिक लक्ष देईल. मला याबाबतील कमीपणा नाही कुणाली भेटायला. सर्वांना भेटून आज एका विचाराने आपण पर्याय देऊ शकलो तर ते देणं ही राष्ट्रीय गरज आहे. ही राष्ट्रीय गरज पूर्ण करण्यासाठी कशाचीही अपेक्षा न करता एकत्र येण्याच्या विचाराशी मी आणि आमचे अनेक सहकारी सहमत आहेत. याची अंमलबजावणी आम्ही सुरु करु,” असं उत्तर पवारांनी दिलं.