जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठी कारवाई केली आहे. हवाई दलाने केलेल्या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत भारतीय हवाई दलाला सलाम केला तर नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशेब घेतला जाईल असं म्हटलं आहे. भारतीय हवाई दलाने केलेली ही कारवाई सध्या फक्त सुरुवात असल्याचंही ते म्हणाले आहेत. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘ये मोदी का हिंदुस्तान है, घर में घुसेगा भी और मारेगा भी’.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १ हजार किलोंचे बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमाने पीओके घुसल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यांनी मोठ्या नुकसानीचे वृत्त फेटाळले आहे.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार सुमारे १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी सीमा पार करून दहशतवादी तळांवर हल्ला केला. यात दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. उरी हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले होते.