कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतमोजणीचे निकाल हाती येऊ लागताच भाजपामध्ये उत्साह संचारल्याचे दिसत आहे. पक्षाचे नेते विजयावर प्रतिक्रिया देत आहेत. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही मागे नाहीत. सातत्याने होणारा पराभव पाहता काँग्रेसने आपल्या नावात बदल करावा असा सल्लाच त्यांनी दिला आहे. इतक्यावरच न थांबता त्यांनी नावही सुचवले असून पाँडेचेरी, मिझोराम, पंजाब काँग्रेस (पीएमपी) असे पक्षाचे नामकरण करण्यास सांगितले आहे. कर्नाटकचे निकाल आता समोर आले आहेत. आता अखिल भारतीय काँग्रेसला आपले नाव बदलून पाँडिचेरी, मिझोराम, पंजाब काँग्रेस (पीएमपी) केले पाहिजे, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

काँग्रेसची कर्नाटकातून सत्ता गेल्यात जमा आहे. सध्या काँग्रेसची पाँडिचेरी, मिझोराम आणि पंजाब या तीन राज्यातच सत्ता आहे. त्यामुळे शिवराजसिंह यांनी काँग्रेसला हा उपहासात्मक सल्ला दिला.

कर्नाटकात भाजपाला मिळालेल्या यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून देशभरात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला जात आहे. जागोजागी भाजपाचे ध्वज घेऊन आणि ढोल वाजवत कार्यकर्ते जल्लोष करत असल्याचे चित्र दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या समर्थनात घोषणाबाजीही केली जात आहे.