गेल्या सत्तर वर्षांपासून टाटा सन्ससोबत असलेल्या शापूरजी पालनजी समुहानं अखेर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा सन्स मधून आता बाहेर पडण्याची वेळ आली आहे, असं शापूरजी पालनजी समुहाकडून सांगण्यात आलं. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही समुहांमध्ये कटुता आल्याचं पाहायला मिळालं होतं. शापूरजी पालनजी समूह हा सायरस मेस्त्री यांच्या कुटुंबाचा आहे. दरम्यान, मंगळवारी शापूरजी पालनजी समूहानं आपण टाटा समुहापासून वेगळं होणं आवश्यक असल्याचं न्यायालयासमोर सांगितलं.

मंगळवारी सरन्यायाधीश शरद बोबडे. न्यायमूर्ती एस. बोपण्णा आणि न्यायमूर्ती रामसुब्रमण्यन यांच्या खंडपीठासमोर खटल्याची सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयानं शापूरजी पालनजी समुहाला झटका देत टाटा सन्सचे समभाग हस्तांतरीत करण्यावर चार आठवड्यांची स्थगिती दिली. तसंच जे समभाग तारण म्हणून ठेवण्यात आले आहेत त्यावर कोणतीही कार्यवाही होणार नसल्याचंही न्यायालयानं सांगितलं. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २८ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.

शापूरजी पालनजी समुहाला निधीची आवश्यकता असेल आणि ते टाटा सन्समधील आपला हिस्सा विकण्यास तयार असतील तर टाटा समूह ते खरेदी करेल, असं टाटा समुहानं मंगळवारी न्यायालयासमोरसांगितलं. शापूरजी पालनजी समुहानं आपल्या दोन सहाय्यक कंपन्या सायरस इन्व्हेस्टमेंट आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून टाटा सन्समधील १८.४ टक्के हिस्सा खरेदी केला होता. तर टाटा सन्सचा अन्य हिस्सा टाटा समुहानं टाटा ट्रस्ट आणि समुहाच्या अन्य कंपन्यांमार्फत घेतला आहे. शापूरजी पालनजी समूह टाटा सन्समधील आपला हिस्सा विकून निधी जमवण्याच्या तयारीत आहे. समुहाला कर्जाची रक्कम फेडण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. परंतु सध्या त्यांच्याकडे केवळ टाटा समुहालाच हा हिस्सा विकण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध असून असं झाल्यास सायरस मेस्त्री यांच्या कंपन्यांचा टाटा समुहातील हिस्सा कमी होणार आहे.

सायरस इनव्हेस्टमेंनं समभाग तारण ठेवून जो निधी जमवला आहे त्या शेअरहोल्डींगचे बाजारातील मूल्य १.५ लाख कोटी रूपये होतं. शापूरजी पालनजी समुहानं हिस्सा तारण ठेवण्यावर स्थगिती आणण्यासाठी ५ सप्टेंबर रोजी टाटा समुहानं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. हरिष साळवे आणि अभिषेक मनू संघवी हे टाटा सन्सकडून खटला चालवत आहे. जर कोणीही समभागांची विक्री केली तर आर्टिकल्स ऑफ असोसिएशनअंतर्गत पहिल्यांदा समभाग खरेदी करण्याचा अधिकार हा टाटा समुहाकडे असेल असं त्यांनी सांगितलं. तर दुसरीकडे टाटा समुहाकडून समभाग तारण ठेवण्यासाठी निर्माण झालेल्या बाधेमुळे कंपनीच्या समस्यांमध्ये वाढ होत असल्याचं मेस्त्री यांच्या वकीलांचं म्हणणं आहे. महामारीच्या पार्श्वभूमीवर आपला समूह वैयक्तीक मालमत्तेच्या सिक्युरीटीवर निधी जमवत होता. ६० हजार कर्मचारी आणि १ लाख स्थलांतरित कामगारांचे उदरनिर्वाहासाठी हा प्रयत्न सुरू आहे. परंतु परंतु टाटा सन्सने निधी उभारणी रोखण्यासाठी केलेली कारवाई त्यांच्या सूडबुद्धीचे उदाहरण आहे, असं मेस्त्री यांच्या समुहाकडून सांगण्यात आलं.