‘यूपीए’च्या पाठिंब्यात असलेल्यांनी देखील थेट राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर टीका करण्यास सुरूवात केली आहे. भारतीयांचे मन जाणून घेण्यात राहुल गांधी अपयशी ठरल्याची टीका ‘इंडियन युनियन मुस्लिम लिग’ने(आययूएमएल) केली आहे.
लोकसभा निवडणूकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवावरून राहुल गांधी यांना जबाबदार धरून ‘आययूएमएल’च्या ‘चंद्रीका’ या मुखपत्रातील अग्रलेखात राहुल गांधी यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. केवळ एका ठिकाणाहून दूसऱया ठिकाणी जाणे म्हणजे देशातील जनतेची मन जाणून घेणे असे होत नाही. जनतेचे मन जाणून घेण्यात राहुल सपशेल अपयशी ठरेल आहेत.
केरळ राज्यात ‘आययूएमएल’ हा काँग्रेसचा गेल्याकाही दशकांपासून मित्र पक्ष आहे. आययूएमएमचे राष्ट्रीय अध्यक्ष इ.अहमद हे यूपीए-१ आणि यूपीए-२ सरकारच्या काळात केंद्रीय मंत्रीही राहीले आहेत. तसेच ‘चंद्रीका’ या मुखपत्राच्या संचालकांमध्येही त्यांचा समावेश आहे.
या मुखपत्रातील अग्रलेखात लोकसभा निवडणूकीतील काँग्रेसच्या पराभवाचे चिंतन करण्यात आले आहे. त्यात राहुल गांधी यांच्या भेटीसाठी काँग्रेसमधील अनुभवी नेत्यांना तासनतास बाहेर बसून रहावे लागे आणि केवळ तरूण नेत्यांनाच त्यांनी आत्मविश्वासात घेतले. त्यामुळे पक्षात योग्य समन्वय राखला गेला नाही. असेही या लेखात म्हटले आहे.