पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले प्रयत्न आणि एक सामान्य चहावाला ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. माणसाने ठरवले तर अमूलाग्र बदल घडू शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून समजते असे गौरोवोद्गार इव्हान्का ट्रम्प यांनी काढले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हान्का या सध्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इव्हान्का ट्रम्प यांनी हैदराबादमधील GES 2017 चे उद्घाटन केले त्याचवेळी इव्हान्का यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळली. भारत हा अमेरिकाचा सच्चा दोस्त आहे या डोनाल्ड ट्रम्प यांचा वाक्याचा पुनरूच्चारही इव्हान्का यांनी त्यांच्या भाषणात केला. माझे वडिल डोनाल्ड ट्र्प हे जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा मला वाटले की मी आता व्यवसाय सोडून माझ्या देशाची सेवा केली पाहिजे. त्यानुसार मी ते करते आहे.

भारत हा अमेरिकेचा सच्चा दोस्त आहे. भारतीय लोकशाहीची उदाहरणे जगात दिली जातात. भारत देश सगळ्या जगासाठी आशेचा किरण आहे असेही इव्हान्का यांनी म्हटले आहे. आज होणारे हे संमेलन भारत आणि अमेरिका यांच्यातील आर्थिक आणि सुरक्षेचे संबंध दृढ होत असल्याचे प्रतीक आहे. ज्या संमेलनात १५०० पेक्षा जास्त महिला आंत्रप्रॅनोर्स आहेत त्या संमेलनात सहभागी होते आहे याचा मला अभिमान वाटतो असेही इव्हान्का यांनी स्पष्ट केले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

महिला सक्षमीकरणावर इव्हान्का ट्रम्प यांनी भर दिला. महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. बऱ्याचदा महिलांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो मात्र समाजाने त्यांच्या पाठिशी उभे राहिलेच पाहिजे असेही मत इव्हान्का यांनी त्यांच्या भाषणात मांडले.