जहाल फुटीरतावादी नेता मसारत आलम याच्या सुटकेच्या वादग्रस्त निर्णयावरून काश्मीरच्या युती सरकारमधील दोन्ही पक्षांचे संबंध टोकाला गेले असतानाच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद आणखी एका फुटीरतावादी नेत्याची सुटका करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. आशिक हुसैन फकटू असे या फुटीरतावादी नेत्याचे नाव आहे. गेल्या २२ वर्षांपासून तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. मानवाधिकार कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याच नेत्याला कारागृहातून बाहेर काढण्यासाठी सईद सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. फकटू याने एका दहशतवादी संघटनेचा म्होरक्या म्हणूनही काम बघितले आहे. त्याच्या सुटकेनंतर काश्मिरमध्ये अशांतता पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मसारत आलम याच्या सुटकेच्या सईद यांच्या या ‘एकतर्फी’ निर्णयाबद्दल भाजपने कडक टीका केली. आलमची सुटका कशी केली, याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने जम्मू-काश्मीर सरकारकडून अहवाल मागवला आहे. राज्य सरकार आलमची सुटका करण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची केवळ अंमलबजावणी करत असून, त्यात भाजपही आपल्यासोबत असल्याचा दावा पीडीपीचे मंत्री इम्रान अन्सारी यांनी केला. सरकार न्यायालयाचा आदर करते व त्यामुळे आम्ही केवळ त्यांच्या आदेशाचे पालन केले आहे. त्यामुळे हा वादाचा मुद्दा बनवणे योग्य नसल्याचे ते म्हणाले.