१२ वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित जम्मू-काश्मिर सेक्स स्कॅंडल प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) माजी डीआयजी आणि तत्कालिन डीएसपी यांना प्रत्येकी १० वर्षांचा तुरूंगवास आणि एक लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर, तीन अन्य दोषींनाही प्रत्येकी १० वर्षांचा तुरूंगवास आणि ५०-५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणात ३० मे रोजी कोर्टाने बीएसएफचे माजी डीआयजी के.सी.पांधी तत्कालिन डीएसपी मोहम्मद अशरफ मीर यांच्यासह ५ जणांना दोषी ठरवलं होतं. न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांकडून कमी शिक्षा सुनावली जावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. पांधी हे देशासाठी दहशतवाद्यांसोबत लढले, त्यांनी जवळपास ४० दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. त्यामुळे त्यांना कमी शिक्षा सुनावली जावी असा युक्तीवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता.

दुसरीकडे, कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी त्यांची नियुक्ती केली होती, असं सरकारी वकील म्हणाले. पांधी आणि मीर यांनी पीडितेला सुरक्षा पुरवायला हवी होती. पण त्यांनी तसं केलं नाही, त्यामुळे सर्व दोषींना जास्तीतजास्त शिक्षा सुनावली जावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती. त्यानंतर कोर्टाने ६ जून रोजी शिक्षा सुनावण्याचा निर्णय घेतला होता.

मार्च २००६ मध्ये पोलिसांना या सेक्स स्कॅंडलची एक सिडी भेटल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती. या व्हिडीओत काही पोलीस अधिकारी व राजकीय पुढाऱ्यांचा समावेश असल्याचं नंतर समोर आलं आणि खळबळ उडाली होती.