भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे. त्यांना केंद्रीय गृहमंत्रीपद देण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाला दिले जाणार? याबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. अमित शाह राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच्या कारकिर्दीत भाजपाने दोनवेळा लोकसभा निवडणूक जिंकली. डिसेंबर महिन्यातल्या पाच विधानसभा निवडणुकांचा अपवाद सोडला तर इतर विधानसभा निवडणुकाही जिंकल्या. अशात त्यांची जागा घेणारा दुसरा नेता कोण असेल अशी चर्चा रंगली आहे. अशातच जे. पी नड्डा यांचे नाव समोर आले आहेत. जगत प्रकाश नड्डा यांचेच नाव भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत  असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

कोण आहेत जे. पी. नड्डा? 
जे. पी. नड्डा हे मागील मंत्रिमंडळात समाविष्ट होते. कमीत कमी प्रकाशझोतात राहून वेगाने कामं करून घेण्याचं कौशल्य नड्डा यांच्यात आहे. आयुष्मान भारत, मोदी केअर या योजना आणण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. अमित शाह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. उत्तर प्रदेशात मतांची टक्केवारी ५० टक्के यावी अशी अपेक्षा अमित शाह यांनी नड्डा यांच्याकडून केली होती. नड्डा यांनी ४९.६ टक्के टक्केवारी आणून दाखवली. जगत प्रकाश नड्डा यांचा जन्म पाटणा या ठिकाणी एका ब्राह्मण कुटुंबात झाला. पाटणा येथील सेंट झेवियर्स विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हिमाचल प्रदेशातून त्यांनी LLB ची डिग्री घेतली. विद्यार्थीदशेत असताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतही नड्डा यांनी सहभाग नोंदवला होता. हिमाचल प्रदेशात शिक्षण घेताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. १९८४ मध्ये स्टुंडट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा पराभव अभाविपने केला होता. ज्यानंतर हिमाचल प्रदेशात पहिल्यांदा विद्यार्थी युनियनचे अध्यक्षपद जे. पी नड्डा यांनी भुषवलं.

१९८६ ते १९८९ या कालावधीत जे. पी. नड्डा हे अभाविपचे राष्ट्रीय सचिव होते. त्यानंतर भारतीय युवा मोर्चा अर्थात भाजयुमोच्या अध्यक्षपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली. वयाच्या ३३ व्या वर्षी त्यांनी हिमाचलमधून आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकून आले. त्यानंतर १९९८ आणि २००७ या दोन्ही वर्षातही त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली आणि जिंकली. या सगळ्या प्रवासानंतर नितीन गडकरी यांच्यामुळे जे. पी. नड्डा यांचा प्रवेश भाजपाच्या राष्ट्रीय राजकारणात झाला. २०१२ मध्ये त्यांनी राज्यसभा लढवली. त्यानंतर ते अमित शाह यांचे विश्वासू सहकारी झाले.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींना मिळालेल्या प्रचंड विजयामागे जे. पी. नड्डा यांचाही महत्त्वाची भूमिका होती. राजनाथ सिंह हे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाले तेव्हाच जे. पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी चर्चा होती. मात्र त्यावेळी ही धुरा अमित शाह यांच्या खांद्यावर टाकण्यात आली. अमित शाह यांनी या संधीचं सोनं केलं हे देशानं पाहिलं आहेच. आता अमित शाह यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर जे. पी. नड्डा हेच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीची पहिली पसंती असतील अशी चर्चा आहे.