अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांना केंद्र सरकारने दणका दिला आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशीनंतर राजखोवा यांना राज्यपालपदावरुन हटवले आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये राजकीय पेच निर्माण झाला असताना राजखोव यांनी घटनात्मक नियमांचे उल्लंघन करत राष्ट्रपती राजवट लागू केली होती. राजखोव यांनी केलेल्या शिफारशी केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजूर केल्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरुन केंद्र सरकारला फटकारले होते. त्यानंतर अरुणाचलमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता आली होती. तेव्हापासून केंद्र सरकार आणि राजखोव यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. अरुणाचलच्या मुद्द्यावरुन राजखोवा यांनी पंतप्रधानांची दिशाभूल केल्याचा दावा गृहमंत्रालयाने केला होता.
काही दिवसांपूर्वी गृहमंत्रालयाने राजखोवा यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. यासाठी राजखोवा यांच्या प्रकृतीचे कारण पुढे करण्यात आले होते. मात्र राजखोवा यांनी राजीनामा देण्यास नकार दिला होता. राष्ट्रपतींनी पदावरुन हटवल्यावरच मी जाईन अशी भूमिका त्यांनी घेतली होती. गृहखात्याने त्यांना ३१ ऑगस्टची मुदत दिली होती. पण त्यानंतरही राजखोवा पदावर कायम होते. ४७ दिवसांच्या उपचारानंतर माझी प्रकृती ठणठणीत आहे. मी पदभार सांभाळण्यासाठी समर्थ आहे अशी भूमिका राजखोवा यांनी घेतली होती.  मी गृहमंत्र्यांशी संपर्क साधला. त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय झालेला नाही असे सांगितले. पण दुस-या केंद्रीय मंत्र्यांने राजीनामा घेण्याचा निर्णय झाला आहे. अशी माहिती खुद्द राजखोवा यांनी दिली होती. शेवटी गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना राजखोवा यांना हटवण्याची शिफारस केली होती. अरुणाचल सरकार आणि राज्यपाल यांच्यात अविश्वासाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यपालांना पदावरुन हटवणे हाच अंतिम पर्याय असल्याची भूमिका गृहखात्याने ऱाष्ट्रपतींसमोर घेतली होती.
पण राष्ट्रपतींनी पदावरुन हटवल्यानंतर राजखोवा यांनी कर्मचा-यांना गाशा गुंडाळण्याची सूचना केली. राजखोवा यांना आता राजभवनात एकही क्षण थांबायचे नाही असे सूत्रांनी सांगितले. राजखोवा यांनी राजीनामा दिल्यानंतर मेघालयचे राज्यपाल व्ही षण्मुगनाथन यांच्या अरुणाचलचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.  राजखोवा यांना जून २०१५ मध्ये अरुणाचल प्रदेशचे राज्यपालपद देण्यात आले होते. मी या पदासाठी भाजपकडे गेलो नाही. हे पद मिळावे यासाठी मी कोणामार्फत दबावही टाकला नव्हता असेही त्यांनी यापूर्वी सांगितले होते. पण वर्षभरातच त्यांना हे पद सोडावे लागले आहे.