मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे चित्रपटात शोभेल अशा पद्धतीने एका दुचाकी शोरूम चालकाला लुटण्यात आले. अक्षय कुमार अभिनित चित्रपट ‘स्पेशल २६’ च्या धर्तीवर तोतया आयबी (गुप्तचर विभाग) अधिकाऱ्यांनी बनावट धनादेश देऊन तब्बल १३५ दुचाकी खरेदी करून कोट्यवधीचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. सुरूवातीला शोरूम मालकाचा विश्वास प्राप्त करण्यासाठी १० दुचाकी खरेदी केल्या आणि त्याचे पैसे दिले. त्यानंतर १३५ दुचाकींची डिलेव्हरी घेतली आणि बनावट धनादेश देऊन शोरूम चालकाची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

तिलकराज मोटर्सचे मालक करणसिंह कोहली यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून चार व्यक्ती स्वत:ला आयबी अधिकारी असल्याचे भासवून दुचाकी खरेदी करत होते. अचानक त्यांचे शोरूममध्ये येणे बंद झाले. त्यामुळे कोहली यांनी संशयित आरोपींनी दिलेला एक कोटीचा धनादेश बँकेत जमा केला. त्यावेळी हा फसवणुकीचा प्रकार उघड झाला. आयबी देशभरातून दुचाकी खरेदी करत असल्याचे या संशयितांनी शोरूम मालकाला सांगितले. तसेच गोपनियतेचा हवाला देत सरकारी परवानगीची कागदपत्रे दाखवण्यास नकार दर्शवला. त्यांनी त्याला एक कोटींचा धनादेश देत तो वटवण्यासाठी पाच महिन्यांची वेळ मागितली.

सातत्याने गोपनीयतेचा हवाला देत वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने त्यांनी सुमारे १३५ दुचाकी खरेदी केल्या. १३५ दुचाकी खरेदी केल्यानंतर या आरोपींनी शोरूममध्ये येणे बंद केले. त्यानंतर हे प्रकरण बँक आणि पोलिसांपर्यंत पोहोचले.

तिन्ही आरोपींनी तोतया आयबी अधिकारी बनून जानेवारी महिन्यात पहिल्यांदा कोहली यांची भेट घेतली होती. जेव्हा डिमांड ड्राफ्ट आला नाही. तेव्हा कोहली यांनी बँकेत धनादेश जमा केला. पण तो धनादेश वटला नाही. त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींची ओळख पटवली आहे. याप्रकरणी दिनेश कुमार, हरिचरण भारद्वाज आणि शक्ती सिंह यांना अटक केली आहे.