ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांचे खाते हॅक करून त्यावर आक्षेपार्ह संदेश टाकण्यात आले आहेत. डोर्सी यांचे ट्विटर खाते हॅक केल्यानंतर त्यावरून काही आक्षेपार्ह संदेश जारी करण्यात आले. त्यात वांशिक शिवीगाळ केली असून ‘चकलिंग स्क्वाड ’ नावाने हॅशटॅग तयार करून खोडसाळपणा करण्यात आला.

‘चकलिंग स्क्वाड’ हे हॅकर गटाचे नाव असण्याची शक्यता आहे. नाझी जर्मनीला पाठिंबा देणाऱ्या संदेशाचे रिट्विट यात करण्यात आले असून वांशिक शिवीगाळ केली आहे. ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले,की जॅक डोर्सी यांचे खाते हॅक झाल्याचे आम्हाला कळून चुकले आहे, त्यावर चौकशी सुरू आहे. ट्विटरला त्यांच्या प्रमुखांचे खाते सुरक्षित ठेवता येत नाही, त्यांनी दोन पद्धतींच्या ओळख तपासणी तंत्राचा वापर करून खाते सुरक्षित का ठेवले नाही, असे टीकात्मक संदेश यानंतर ट्विटरवर आले आहेत.

सुरक्षिततेच्या कारणास्तव ट्विटरने आशयाची सफाई मोहीम सुरू केली असतानाच त्यांचे प्रमुख डोर्सी  यांचे खाते हॅक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

ट्विरने अलीकडे मँचेस्टर युनायटेड रिप्रेझेंटेटिव्हची भेट घेऊन  समाज माध्यमांवर फुटबॉलपटूंबाबत वांशिक टिपण्यांना प्रतिबंध करण्याबाबत आश्वासन दिले होते. ब्रिटनचे सायबर सुरक्षा तज्ज्ञ ग्रॅहॅम क्लुली यांनी म्हटले आहे, की दोन घटकांवर आधारित वापरकर्ता ओळख पडताळणी पद्धत वापरणे यासाठी आवश्यक आहे. यात  वापरकर्त्यांला त्याचे खाते बाह्य़ सेवेच्या माध्यमातून ओळख पटवून चालवावे लागते. प्रत्येकाजवळ २ एफए (टू फॅक्टर आयडेंटिफिकेशन) वर आधारित वेगळा पासवर्ड असणे गरजेचे आहे.  सायबर सुरक्षा तज्ज्ञ केविन बेहूमाउंट यांनी सांगितले,की डोरसी यांचे खाते त्रयस्थ क्लाउडहॉपरने हॅक केले असावे. क्लाउड हॉपरचा ताबा ट्विटरने १० वर्षांपूर्वी घेतला होता. त्यांना ट्विटर खात्यांची माहिती मिळत असते. क्लाउड हॉपरच्या मदतीने वापरकर्त्यांना एसएमएसद्वारे ट्विट संदेश जात असतात.