महिलांच्या कौमार्यासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली होती. महिला आयोगाकडून चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांनी लिहिलं होतं की, कुमारी वधू का नाही? तुम्ही कोल्ड ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी करताना सील तुटलेलं असेल तर चालेल का ? पुढे त्यांनी लिहिलं होतं की, अशी मुलं मूर्ख असतात ज्यांना पत्नी म्हणून कुमारी वधू मिळण्याचा फायदा माहिती नसतो.

इथंच न थांबता आपल्या पुढे कनक सरकार यांनी म्हटलं की, “मुलगी जन्माला आल्यापासून तोपर्यंत सील्ड असते जोपर्यंत ते उघडलं जात नाही. कुमारी मुलीचा अर्थ संस्कृती, मूल्यं तसंच लैंगिक स्वच्छतेसोबत अनेक गोष्टी आहेत. अनेक मुलांसाठी कुमारी वधू एखाद्या परीप्रमाणे असते.”

प्रतिष्ठित विद्यापीठाच्या साक्षात प्राध्यापकांच्याच अत्यंत आक्षेपार्ह व हिणकस अशा या पोस्टमुळे प्रचंड गदारोळ झाला होता. आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी अभ्यास करणाऱ्या शिक्षक विद्यार्थ्यांच्या समितीने कनक सरकार यांना हटवण्याची मागणी केली होती. यानंतर त्यांना विद्यापीठात येण्यापासून रोखण्यात आलं आहे. कनक सरकार यांच्या वक्तव्यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाल्याची प्रतिक्रिया कुलुगरु सुरंजन दास यांनी दिली आहे.

कनक सरकार यांच्या या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ होऊ लागल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली होती. आपण काहीच चुकीचं बोललेलो नाही. राज्यघटनेने मला माझं मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे असं कनक सरकार यांनी म्हटलं होतं. आपण नेहमी महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत असल्याचं कनक सरकार यांचं म्हणणं आहे. हे आपलं वैयक्तिक मत होतं, असंही ते म्हणाले होते.