आपल्या कंपनीतील गुंतवणुकीच्या मोबदल्यात लाभ करून दिल्याच्या प्रकरणाच्या संबंधात एका विशेष सीबीआय न्यायालयाने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना १० जानेवारीला न्यायालयात हजर होण्यास सांगितले आहे.

आपल्याला न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी, याबाबत रेड्डी यांनी केलेल्या अर्जाची सुनावणी करताना न्यायालयाने शुक्रवारी हे निर्देश दिले. जगनमोहन हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून, मुख्यमंत्री म्हणून आपण अतिशय व्यग्र असल्याचे कारण देऊन ते आतापर्यंत न्यायालयात हजर झालेले नाहीत. न्यायालय दर शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी करत होते. यापूर्वी, सुनावणीत वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून सूट मागणारी रेड्डी यांची विनंती न्यायालयाने अमान्य केली होती. सीबीआयनेही त्यांच्या अर्जाला विरोध केला होता. संबंधित प्रकरणांमध्ये मे २०१२ मध्ये अटक करण्यात आल्यानंतर जगनमोहन हे १५ महिने तुरुंगात होते. सप्टेंबर २०१३ मध्ये चंचलगुडा कारागृहातून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणातील साक्षीदारांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या प्रभाव टाकू नये, असे विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना जामीन देताना सांगितले होते.