स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. त्याला जोधपूरमधल्या एमडीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. तो सध्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

त्याच्यासोबत तुरुंगातल्या १२ कैद्यांना करोनाची लागण झाल्याचं कळत आहे. आसाराम बापूला गेल्या काही दिवसांपासून करोनाची सौम्य लक्षणं दिसत होती. त्यामुळे त्याची चाचणी करण्यात आली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक तपासणीनंतर त्याला आयसीयूत दाखल करण्यात आलं.

फेब्रुवारी महिन्यात त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्याला जोधपूरमधल्या या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तपासणी केल्यानंतर विशेष काही गंभीर नसल्याचं लक्षात आलं आणि दोन दिवसांनंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

आसाराम सध्या जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवास भोगत आहे. आपल्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २०१४ साली त्याला इंदौरमधून अटक करण्यात आली.