समुद्री चाच्यांना मदत केल्याच्या आरोपावरून टोगोच्या तुरुंगात गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षा भोगत असलेले भारतीय नाविक सुनील जेम्स यांची सुटका करण्यात आली आहे. ते शुक्रवारी भारतात पोहोचतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सूत्रांनी गुरुवारी दिली. जेम्स अटकेत असताना त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जोपर्यंत जेम्स भारतात येत नाही, तोपर्यंत मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी जेम्सच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते.
समुद्री चाच्यांना मदत केल्याच्या आरोपावरून ३१ वर्षीय सुनील जेम्स यांना मागील १६ जुलै रोजी पश्चिम आफ्रिकेतील टोगो या देशात अटक करण्यात आली होती. सुनील अटकेत असताना २ डिसेंबर रोजी त्यांचा ११ महिन्यांचा मुलगा विवान आजारी होता. मात्र उपचारांना यश न आल्यामुळे अखेर त्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवागरात ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सुनील यांची सुटका व्हावी यासाठी भारतीय अधिकारी टोगो प्रशासनाच्या संपर्कात होते. अखेर भारतीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले असून टोगो प्रशासनाने सुनील यांची सुटका केली आहे.