तिहार तुरुंगात असलेली अपूर्वा शुक्ला सध्या टॅरो कार्डचे वाचन शिकत आहे. टॅरो कार्डपाहून भविष्य वर्तवले जाते. पती रोहित शेखरच्या हत्येप्रकरणी अपूर्वा सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. रोहित शेखर माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचा मुलगा होता. तिहार तुरुंगात आठवडयात दोन वेळा दोन तासांसाठी टॅरो कार्ड कसे पाहायचे ते शिकवले जाते.

अपूर्वा या सेशनला पहिल्या रांगेत बसलेली असते असे डॉ. प्रतिभा सिंह यांनी सांगितले. मागच्या दीड वर्षापासून प्रतिभा सिंह येथे टॅरो कार्डचे क्लासेस घेत आहेत. अपूर्वाने माझ्याशी संपर्क साधला. आतापर्यंत आम्ही सात वर्ग पूर्ण केले आहेत. एकदा कोर्टात सुनावणी असल्यामुळे क्लास चुकला होता. त्याबद्दल तिने खंतही व्यक्त केली होती असे डॉ. सिंह यांनी सांगितले.

अपूर्वाला टॅरो कार्डचे वाचन शिकायचे होते पण प्रत्येकवेळी काही ना काही कारणांमुळे तिला हे शिकता आले नाही. हत्येचा आरोप असलेली अपूर्वा शांत असते. टॅरो कार्ड शिकण्यासाठी तिच्यात आत्मविश्वास आणि उत्साह दिसतो असे प्रतिभा सिंह म्हणाल्या. दुसऱ्या महिलेसोबत दारु पिण्यावरुन झालेल्या वादातून रोहित शेखरची हत्या केल्याचा अपूर्वावर आरोप आहे. तिला आपल्या या कृत्याबद्दल कुठलाही पश्चाताप वाटत नाही असे तुरुंगातील सूत्रांनी सांगितले. १५ एप्रिलच्या रात्री रोहित शेखरची हत्या करण्यात आली होती.