प्रमोशन मिळाल्यानंतर प्रत्येकाची आनंद साजरा करण्याची एक वेगळी पद्धत असते. करिअरमधील हा महत्त्वाचा क्षण काहीजण कुटुंबासोबत तर काहीजण मित्रांसोबत दिवस साजरा करतात. पण जयपूरचे आयपीएस अधिकारी राहुल प्रकाश यांनी मात्र वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करत सर्वांसमोर उदाहरण ठेवलं आहे. राहुल प्रकाश यांनी आपला सन्मान करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची निवड केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्यांनी आपल्या वर्दीवर पदोन्नतीचे स्टार लावून घेतले.

राहुल प्रकाश यांना डीसीपी पदावरुन पोलीस उपमहानिरीक्षकपदी (वाहतूक) बढती मिळाली. बढती मिळाल्यावर पोलीस अधिकाऱ्यांच्या शोल्डर बॅजमध्येही बदल होतो. अनेकदा वरिष्ठ अधिकारी संबंधित अधिकाऱ्याच्या खांद्यावर पदोन्नतीचे स्टार लावतात. मात्र राहुल प्रकाश यांनी यासाठी वाहतूक नियंत्रण कक्षातील सफाई कर्मचाऱ्यांची निवड केली. त्यांच्या हस्ते त्यांनी पदोन्नती स्टार लावून घेतले. तसंच राहुल प्रकाश यांनी आपल्या विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांसोबत हा दिवस साजरा केला.

राहुल प्रकाश यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राहुल प्रकाश यांनी असं केल्याने आपल्याला अभिमान वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “तुमच्याकडू सन्मानित झाल्याने मला अभिमानास्पद वाटत आहे,” असं राहुल प्रकाश यांनी सफाई कर्मचाऱ्यांना यावेळी म्हटलं. यावेळी त्यांनी कोणीही मोठं किंवा छोटं नसतं असंही सांगितलं. एखाद्या अधिकाऱ्याने सफाई कर्मचाऱ्याकडून पदोन्नती स्टार लावून घेण्याची कदाचित देशातील पहिलीच वेळ आहे.