जगभरातील साहित्यिकांची आणि साहित्यप्रेमींची मांदियाळी जयपूरमध्ये दाखल झाली आहे. सातव्या जयपूर साहित्य मेळय़ाला शुक्रवारपासून सुरुवात झाली असून, पाच दिवस चालणाऱ्या या साहित्य महोत्सवाला तब्बल दोन लाख साहित्यप्रेमी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्यासह अनेक ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, इतिहासकार, कलावंत या मेळय़ास उपस्थित राहणार आहेत. राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी शुक्रवारी सकाळी पारंपरिक ज्योत पेटवून या मेळय़ाचे उद्घाटन केले. ‘हा साहित्याचा कुंभमेळा आहे,’ असे वर्णन अल्वा यांनी या मेळय़ाचे केले.